ताडोबा, मुंबईत बिबट्या सफारी
By Admin | Published: October 4, 2015 04:06 AM2015-10-04T04:06:57+5:302015-10-04T04:06:57+5:30
मुंबईच्या बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व चंद्रपूरमध्ये ताडोबानजीक बिबट्या सफारी उभारण्यात येणार आहे. राज्याच्या विविध भागांत सापडणाऱ्या बिबट्यांना
- यदु जोशी, मुंबई
मुंबईच्या बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व चंद्रपूरमध्ये ताडोबानजीक बिबट्या सफारी उभारण्यात येणार आहे. राज्याच्या विविध भागांत सापडणाऱ्या बिबट्यांना या ठिकाणी आणले जाईल. बिबट्या एखाद्या घरात घुसला, गावात घुसून दहशत पसरविली, कुणावर हल्ला केला, अशा बातम्या अनेकदा येत असतात.
अशा वेळी या बिबट्यांना पकडून नंतर जंगलात सोडून दिले जाते. आता संजय गांधी उद्यान किंवा ताडोबा हा त्यांचा स्थायी पत्ता असेल. पर्यटकांना या सफारींचा आनंद घेता यावा यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था असेल. या सफारीमुळे एकाच परिसरात वाघ आणि बिबटे बघण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील वन्यजीव मंडळाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, की लवकरच याबाबतची मान्यता मिळेल. संजय गांधी उद्यानातील बिबटे सफारीला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून तत्त्वत: मान्यता मिळाली असून, त्या मान्यतेच्या आधीन राहूनच राज्य वन्यजीव मंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. संजय गांधी उद्यानात बिबट्या सफारीसाठी मॅफको व सिंहविहाराच्या सीमेलगत २५ हेक्टर जागा निश्चित केली आहे. ताडोबा बफर क्षेत्राच्या बाहेर बिबट सफारी उभारण्याची योजना आहे.
दोन्ही ठिकाणी फुलपाखरू उद्यान
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली व ताडोबा व्याघ्रप्रकल्पानजीक फुलपाखरू उद्यान उभारण्यात येणार आहे. वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये मंगलोरनजीक उभारलेल्या फुलपाखरू उद्यानाच्या धर्तीवर ही उद्याने असतील.
वन्यजीव विकास निधी स्थापणार
वन्यजीवांवर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांच्या खर्चाच्या २ टक्के रक्कम ही वन्यजीव क्षेत्राच्या विकासासाठी घेण्यात येणार आहे. त्यासाठी वन्यजीव विकास निधी स्थापन करण्यात येणार आहे.
तिलारीत अभयारण्य
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी घाटात वन्यजीव अभयारण्य उभारण्याचेही प्रस्तावित आहे. या भागात वाघ, हत्ती, स्लेंडरलोरीस,किंग कोब्रा, धनेश, गवा, सांबर, बिबट, भेकर, अस्वल आदी प्राणी आढळतात.