बिबट्याच्या कातडीची तस्करी
By admin | Published: June 20, 2016 01:06 AM2016-06-20T01:06:35+5:302016-06-20T01:06:35+5:30
जिल्ह्यात बिबट्याची कातडी व नखांची तस्करी करणाऱ्या ३ जणांची टोळी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथकाने जेरबंद करून
लोणी काळभोर : जिल्ह्यात बिबट्याची कातडी व नखांची तस्करी करणाऱ्या ३ जणांची टोळी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथकाने जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे कातडे व नखे जप्त केली आहेत.
पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार : पथकाने बाळू गवबा मधे (वय २५), सोमनाथ सुखदेव मधे (वय २७, दोघेही रा. चास पिंपळदरे, पो. ब्राम्हणवाडा, ता. अकोले, जि. अहमदनगर) व सूर्यकांत शांताराम काळे (वय ३२, रा. म्हसवडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या तिघांना अटक केली आहे. जिल्ह्यातील फरारी व हवे असलेले आरोपी पकडणे तसेच त्यांची माहिती काढण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती़ गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन मोरे, पोलीस हवालदार शरद वांबळे, विशाल साळुंके, चंद्रशेखर मगर, शफी शिलेदार, विघ्नहर गाडे, राजेंद्र पुणेकर, वसंत आंब्रे या पथकाने या तिघांना पकडले आहे.रविवारी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण-अहमदनगर महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबऱ्यांकडून अहमदनगर जिल्ह्यातील म्हसवडी गावच्या बाजूकडील डोंगरांतून पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे तिघे जण बिबट्याची कातडी व नखे विक्रीकरिता घेऊन येणार असल्याची माहिती राम जाधव यांना कळवली. त्यांनी पथकास योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. मिळालेल्या माहितीनुसार डोंगरांतून तिघे जण आले. त्यांना जागीच पकडून त्यांच्याकडील रंगाच्या पिशवीची तपासणी केली असता त्यांना त्यामध्ये बिबट्यासदृश प्राण्याची कातडी, तसेच एका बॅगेत मिशांचे केस व नखे सापडली.
या तिघांनी संगनमताने कोणत्या तरी जंगलात अनधिकृतपणे प्रवेश करून हत्यार अथवा शस्त्राने शिकार करून विक्री करण्याच्या हेतूने त्याची कातडी व नखे केसांसह सोलून आणली, म्हणून त्यांना वन्यप्राणी कायदा कलमान्वये अटक करण्यात आली. (वार्ताहर)