बदलापूर : चामटोलीच्या जंगलात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 05:44 PM2018-02-08T17:44:22+5:302018-02-08T17:54:36+5:30
चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत.
बदलापूर - चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत. या जंगलात बिबट्या नामशेष झाले होते. मात्र आता पुन्हा बिबट्या या भागात आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहणी केली असता बिबट्यासोबत त्याचे दोन बछडेदेखील असल्याची स्पष्ट केले आहे.
चंदेरीच्या पर्वत रांगेत पूर्वी वन्य जिवांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. बिबटेदेखील या भागात होते. मात्र गेल्या 20 ते 25 वर्षात या भागात ग्रामस्थांना कधी बिबट्याचा वावर जाणवला नाही. मात्र गेल्या महिन्याभरापासून या भागात एक बिबट्या बक-यांची शिकार करत असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. रानात चरण्यासाठी गेलेल्या बक-यांपैकी काही बक-यांची शिकार या बिबटय़ाने केली होती. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. चामटोली भागातील जंगलात हा बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांना जंगलात जाताना सतर्क राहण्याचे आदेश वन विभागाने दिले आहे. तर बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. या भागात बिबट्या फिरत असला तरी त्याने अद्याप मानवी वस्तीत हल्ला चढवलेला नाही. या भागातील जंगलात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबटय़ाला मुबलक शिकार मिळत आहे. मात्र रानडुक्करची शिकार करतांना या बिबट्याला बक-या दिसल्याने त्याने ही शिकार केल्याचे वन विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी स्पष्ट केले. या बिबट्याचा ग्रामस्थांना सध्या तरी कोणताच धोका असल्याचे दिसत नाही. मात्र ग्रामस्थांनी जंगलात जाताना दक्षता घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
चामटोली भागात बिबट्या आल्याची चर्चा असताना गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी चामटोली येथील ताण गावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसेदेखील त्यांना सापडले आहेत. तर काही आदिवासीयांनी दोन बछड्यांसह या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. तर एका शेतक-याने बिबट्या पाणी पितानादेखील पाहिले आहे. या शेतक-यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केलेला असतानाच आता वन विभागाने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. बिबट्या हा या जंगलात पुन्हा आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या शेतक-यांच्या शेळळ्या ह्या बिबट्याने खाल्ले आहेत त्यांना भरपाई देण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
‘‘भीमाशंकरच्या जंगलातून हे बिबटे या भागात आल्याची शक्यता आहे. बछड्यांसह हा बिबटा फिरत असल्याने हे जंगल त्यांच्यासाठी सुरक्षित वाटत असेल. गावाच्या जवळच बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचा वावर हा नैसर्गिक असल्याने ग्रामस्थांनीच काळजी घेणो गरजेचे आहे''. - चंद्रकांत शेळके, वनअधिकार.