‘लेपर्ड सफारी पार्क’ चाकण की आंबेगव्हाणला?

By admin | Published: August 26, 2016 01:11 AM2016-08-26T01:11:37+5:302016-08-26T01:11:37+5:30

'लेपर्ड सफारी पार्क' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चाकण येथे करण्याच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

'Lepard Safari Park' Chakan Ambegavan? | ‘लेपर्ड सफारी पार्क’ चाकण की आंबेगव्हाणला?

‘लेपर्ड सफारी पार्क’ चाकण की आंबेगव्हाणला?

Next

नितीन ससाणे,

जुन्नर- महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर जुन्नर तालुक्याला मानाचे स्थान मिळवून देणार असलेल्या आंबेगव्हाण येथील नियोजित 'लेपर्ड सफारी पार्क' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चाकण येथे करण्याच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याची चर्चा आहे.
नुकतीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाकण आंळदी रस्त्यावरील वन विभागाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष जागेची पाहणी, चाचपणी केल्याची चर्चा आहे. चाकण येथील प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांत जुन्नर येथील मुख्य कार्यालयात दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी लेपर्ड सफारी पार्क हा प्रकल्प तालुक्यात पर्यटनसंवर्धनासाठी आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत या प्रकल्पाबाबत आमदारांची बैठक झाली होती. त्यानुसार ओतूर परिसरातील आंबेगव्हाण येथे लेपर्ड सफारी पार्क निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी आंबेगव्हाण येथे जागेची निवड व तत्सम प्रशासकीय कार्यवाही वन विभागाने सुरू केलेली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही राजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, मागील काही दिवसांत हा नियोजित प्रकल्प खेड तालुक्यातील चाकण येथे वन विभागाच्या क्षेत्रात करण्याबाबत वन विभागाने प्रशासकीय कार्यवाही सुरू केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
>सेंट्रल झू आॅथॉरिटीकडून प्रत्यक्ष पाहणी, काटेकोर निकषांची पूर्तता यानंतरच या प्रकल्पाच्या जागेवर शिक्कामोर्तब होईल.
लेपर्ड सफारी पार्कमध्ये जंगली अधिवासात मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याचे दर्शन पर्यटकांना बंदिस्त वाहनात बसून घेता येणार आहे.
लेपर्ड सफारी पार्क प्रकल्पावरून आमदार व वन विभाग यांच्यात प्रशासकीय संघर्ष होण्याची चिन्हे.
जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या ४ तालुक्यांचे वन विभागाचे (घोडप्रकल्प) मुख्य प्रशासकीय कार्यालय जुन्नर येथे आहे.
>वन विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, प्रकल्पाच्या देखभालीचा खर्च व अपेक्षित उत्त्पन्न यांचा ताळमेळ बसणार नाही अशी गृहीतके वन विभागाकडून मांडण्यात येत असल्याची चर्चा आहे.
जुन्नर तालुक्यात पर्यटनस्थळांची विविधता आहे. त्यात लेपर्ड सफारी पार्कमुळे भर पडेल, अशा जुन्नर तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत; त्यामुळे आता अखेरीस हे केंद्र कुठे जाते, हाच औत्सुक्याचा मुद्दा आहे.

Web Title: 'Lepard Safari Park' Chakan Ambegavan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.