कुष्ठरोगींना मिळणार एमसीआरची चप्पल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:13 PM2018-10-27T23:13:56+5:302018-10-27T23:14:15+5:30
विशेष प्रकारचा रबर; राज्य शासनाने केली ६० लाखांची तरतूद
दिगांबर जवादे
गडचिरोली : पायाची संवेदनशीलता हरविलेल्या कुष्ठरोगींना शासनाकडून एमसीआर (मायक्रो सेल्युलर रबर) या विशेष प्रकारच्या रबराची चप्पल वितरित केली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६० लाख रुपयांची तरतूद केली असून राज्यभरातील १० हजार रुग्णांना ही चप्पल उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यभरात कुष्ठरोगाचे जवळपास २० हजार रुग्ण आहेत. २४ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुष्ठरोग झाल्यानंतर शरीराच्या त्या भागाची संवेदनशीलता नष्ट होते. त्या ठिकाणी इजा झाल्यास रुग्णाच्या लक्षात येत नाही. साध्या चप्पलचा वापर केल्यास तळपायाच्या विशिष्ट भागावरच शरीराचे वजन राहते. ज्या ठिकाणी वजन पडते, त्याच ठिकाणी कुष्ठरोग झाला असल्यास सततच्या भारामुळे जखम आणखी वाढण्याचा धोका राहतो. पायाचा गँगरिन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तळपायाला कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी एमसीआर ही चप्पल वरदान ठरणारी आहे.
चपलेच्या मागे पट्टा लाभदायक
या चपलेचा तळ अतिशय मऊ असल्याने शरीराचा भार तळपायाच्या विशिष्ट भागावर न पडता पूर्ण भागावर पडतो. त्याचबरोबर या चपलेच्या मागच्या बाजूनेसुद्धा पट्टा दिला असल्याने चप्पल पायातून घसरत नाही.
या चपलेचे फायदे कुष्ठरोग रुग्णांना होत आहेत. मात्र ही चप्पल सर्वसाधरण चपलेपेक्षा महाग आहे. त्यामुळे शासनाने स्वत:च चप्पल खरेदी करून त्या कुष्ठरोग कार्यालयाच्या वतीने वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे २० हजार चप्पल खरेदी केल्या जाणार आहेत. प्रत्येक पात्र रुग्णाला सहा महिन्यांतून एक जोड याप्रमाणे वर्षातून दोन जोड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.