३५ जिल्ह्यांत कुष्ठरुग्ण शोधमोहीम; मानसिक आरोग्याबाबतही माहिती नोंदविली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:10 PM2022-09-05T12:10:36+5:302022-09-05T12:12:44+5:30
संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. शोध पथकाद्वारे विविध लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.
मुंबई : राज्यात कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. दि. १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कुष्ठरोगासह मानसिक आरोग्याबाबतही माहिती नोंदविली जाणार आहे.
आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय कुष्ठरुग्ण शोधमोहीम आणि मानसिक आजाराबाबत जागरुकता अभियान सुरू करण्यात येणार आहे.
संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. शोध पथकाद्वारे विविध लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन संशयित कुष्ठरुग्ण आढळल्यास रोग पूर्ण निदानासाठी त्याला रुग्णालयात पाठविले जाणार आहे किंवा मोहिमेच्या ठिकाणीच त्यांची ही तपासणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरुग्ण तसेच मानसिक आजाराचे रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आशा सेविका आणि आरोग्य सेविकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात
आले आहे.
योजनेची उद्दिष्ट्ये
- जास्तीत जास्त कुष्ठरोगी शोधून उपचार करणे. यातून एकूण जंतुभार कमी करून संसर्गाचे प्रमाण कमी करणे.
- समाजातील कुष्ठरोगाचे एकूण प्रमाण दहा हजारी एकपेक्षा कमी करणे.
- अंतिम उद्दिष्ट भारताला कुष्ठरोगमुक्त करणे. या उद्देशाने कुष्ठरोग नियंत्रण योजना आता कुष्ठरोग निर्मूलन योजना झालेली आहे.