मुंबईत लेप्टोचे १५ बळी
By admin | Published: July 11, 2015 02:08 AM2015-07-11T02:08:34+5:302015-07-11T02:08:34+5:30
पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. जुलैमधील १० दिवसांत शहरात लेप्टोस्पायरोसीसने १५ जणांचा बळी गेला असून
मुंबई : पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. जुलैमधील १० दिवसांत शहरात लेप्टोस्पायरोसीसने १५ जणांचा बळी गेला असून, रुग्णांचा आकडा ४६पर्यंत वाढला आहे. एकाच दिवसात १० रुग्ण आढळल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
३ ते ९ जुलैदरम्यान मालाड परिसरात ६ जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला असल्याने या ठिकाणी पालिकेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. १ ते १० जुलैदरम्यान लेप्टोचे ४६ रुग्ण आढळून आले. जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. याच कालावधीत अनेकांना लेप्टोची लागण झाल्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे. साचलेल्या पाण्यात उंदराचे मूत्र मिसळून ते पायाच्या असलेल्या जखमेतून शरीरात गेल्यास लेप्टोची लागण होण्याचा धोका वाढतो. पाळीव प्राण्यांपासूनही लेप्टोचा धोका आहे.
अंगदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे अशी सर्वसाधारण लक्षणे असल्यामुळे अनेकदा रुग्ण दुर्लक्ष करतात. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे जीव गमवावा लागत असल्याचे महापालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेने मूषक शोधमोहीम सुरू केली असून, ६ हजार २५३ घरांची पाहणी केली. ४ इमारतींच्या परिसरात, ५ चाळींमध्ये आणि साचलेल्या पाण्याच्या तीन ठिकाणी औषध फवारणी केली. (प्रतिनिधी)