निम्म्यापेक्षा कमी टोल दाखविला जातो
By admin | Published: October 6, 2015 01:59 AM2015-10-06T01:59:27+5:302015-10-06T01:59:27+5:30
पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जात असल्याने जमा होणारा महसूलही त्या प्रमाणात कमी जमा झाल्याचे दाखविले जाते.
पुणे : पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जात असल्याने जमा होणारा महसूलही त्या प्रमाणात कमी जमा झाल्याचे दाखविले जाते. या नाक्यांवर किती रक्कम जमा झाली, याची राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेगवेगळी माहिती दिली जात असून, त्यात काही कोटी रुपयांची तफावत आहे़ त्यावरूनच हे स्पष्ट होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी सांगितले की, २००५ ते २०१५ या १० वर्षांत सातारा-कागल महामार्गावरील किणी आणि तासवडे नाक्यांवर जमा झालेली एकत्रित रक्कम तर संभ्रम निर्माण करणारी आहे. एमएसआरडीसीच्या टोल मॉनेटरिंग युनिटने याची ६८७ कोटी आणि ७१९ कोटी रुपये अशी वेगवेगळी आकडेवारी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ने ही रक्कम ८८५ कोटी रुपये सांगितली आहे़ त्यामुळे नेमका किती टोल जमा झाला हेच स्पष्ट होत नाही.
या टोलनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनसंख्यांमध्येही प्रचंड तफावत आहे.तासवडेवरून २००३मध्ये दररोज सरासरी ९ हजार ८८५ वाहने तर, किणीवरून १० हजार ८६१ वाहने जात असल्याचे सांगण्यात आले होते़ करारात दरवर्षी ५ टक्के वाढ गृहीत धरली आहे. आॅक्टोबर २०१४मध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये तासवडेवरून दररोज सरासरी १० हजार ४२५ वाहने तर किणीवरून ९ हजार ६२ वाहने जात असल्याचे दाखविण्यात आले आहे.