मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 06:22 AM2024-05-21T06:22:39+5:302024-05-21T06:23:51+5:30
मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले.
मुंबई : मतदार यादीत नावे नाहीत, बायकोचे नाव एकीकडे, नवऱ्याचे नाव दोन किलोमीटर लांबच्या मतदार केंद्रात, मोबाइल केंद्रावर फोन न्यायचा की नाही, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न, अशा प्रचंड गदारोळ आणि गोंधळात मुंबई, ठाण्याच्या दहा लोकसभा मतदारसंघांत शेवटचा टप्पा पार पडला. यामुळे मतदानाचा टक्का तर वाढला नाहीच, उलट गोंधळाचा टक्का मात्र सर्वाधिक ठरला.
मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. मुंबईतील अनेक मतदारसंघांत ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. ते बदलण्यात बराच वेळ गेला. मुंबई, कल्याण, पालघर या भागांत ईव्हीएम मशीन अतिशय धिम्यागतीने चालत असल्याच्या तक्रारी होत्या.
रांगेतील उभ्या असणाऱ्यांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. तारे-तारकांना मतदान केंद्रावर व्हीआयपी वागणूक मिळत होती, त्याच्या उलट वागणूक ज्येष्ठ नागरिकांना मिळत होती. काही ठिकाणी मोबाइल मतदान केंद्रात नेता येणार नाहीत, अशी सक्ती केली गेली, तर काही ठिकाणी मोबाइल बंद ठेवून मतदानाला जाऊ दिले गेले.
निवडणूक कर्मचाऱ्यांचे उपाशीपाेटी कर्तव्य
nमतदानासाठी रविवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना, तसेच पोलिसांना दिवसभर जेवायला मिळाले नाही. पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो, असे उत्तर देण्यात आले, पण कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र सोडायचे नाही, अशी त्यांच्यावर सक्ती होती.
n१०० मीटरच्या अंतरातील खाण्यापिण्याची ठिकाणेदेखील बंद करण्यात आली होती. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी घरून डबे आणणे अपेक्षित असल्याचे उत्तर दिले गेले, पण निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून कर्मचारी, अधिकारी, पोलिस बोलावण्यात आले होते. त्यांचे इथे घर नाही. अशांनी डबे आणायचे कुठून? यावर कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हते.
शेकडाे लाेक कंटाळून फिरले माघारी
ज्या मतदारांकडे मतदानाची स्लिप होती, त्यांचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र तपासणे आणि ते त्यांचेच आहे की नाही, हे बघणे यात प्रचंड वेळ गेल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन ते तीन तास लोकांच्या रांगा लागल्या.
लोक कंटाळून रांगा सोडून घरी निघून गेल्याचेही चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. काही ठिकाणी मतदाराची उलट तपासणी केल्यासारखी चौकशी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. ज्या ठिकाणी विरोधक आरडाओरड करत होते, तिथे मतदानाचा वेग वाढताना दिसत होता.
धुळ्यात दगडफेक, नाशिकमध्ये बाचाबाची
nनाशिक येथील एका मतदानकेंद्रावर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धवसेनेचे पदाधिकारी माजी आमदार वसंत गीते हे समोरासमोर भिडले. यावेळी गीते व फरांदे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अरेरावी सुरू होताच भाजप व शिंदेसेनेचे कार्यकर्ते व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
nधुळ्यात बोगस मतदानाच्या संशयावरून नवभारत चौकात दगडफेक झाली. घटनेमागील नेमके कारण अस्पष्ट असले, तरी बोगस मतदानाच्या संशयावरून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात आली.