‘स्वच्छते’कडे ३४ गावांची पाठ
By Admin | Published: August 2, 2016 03:03 AM2016-08-02T03:03:31+5:302016-08-02T03:03:31+5:30
हागणदारीमुक्त गाव मोहिमेच्या जनजागृतीसाठी रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
उरण : हागणदारीमुक्त गाव मोहिमेच्या जनजागृतीसाठी रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांत उरणमधील ३४ ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. मात्र लोकसहभागाअभावी स्वच्छ ग्राम योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यात स्वच्छतागृहांअभावी ग्रामीण भागातील महिलांची कुचंबणा होत आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून उरण तालुक्यात गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या मदतीने ३४ ग्रामपंचायतीमध्ये हागणदारीमुक्त गाव योजनेअंतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र या उपक्रमास लोकसहभागाअभावी अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव संकल्पनेला ब्रेक लागला आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने यंदा वार्षिक कृती आराखडा तयार केला असून चालू वर्षात सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये शौचालय उभारण्यात येणार असून १० कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे पडून आहे. शौचालय नसलेल्या नागरिकांना सरकारतर्फे शौचालय बांधण्यासाठी १२ हजारांचे अनुदानही देण्यात येते. शाळा, कॉलेजमध्ये जनजागृतीसाठी वादविवाद, वक्तृत्त्व, निबंध आदी स्पर्धा घेतल्या जातात. गाव पातळीवर बैठका, मासिक सभा घेतल्या जात असल्या तरी लोकसहभागाअभावी योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
>गावातील कुटुंब सदस्य संख्यापैकी १० टक्के कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असतील व कोणी उघड्यावर जात नसेल तर अशी ग्रामपंचायत हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात येते. यासाठी शासनाच्या सूचनेनुसार योजनेचे काम सुरु आहे.
- शैलेश पेंडकलकर,गट समन्वयक