विद्यापीठात विद्यार्थी गिरविणार पुरातत्त्व शास्त्राचे धडे

By admin | Published: June 5, 2017 02:43 AM2017-06-05T02:43:11+5:302017-06-05T02:43:11+5:30

मुंबई विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून पुरातत्त्व शास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

Lessons of Archeology | विद्यापीठात विद्यार्थी गिरविणार पुरातत्त्व शास्त्राचे धडे

विद्यापीठात विद्यार्थी गिरविणार पुरातत्त्व शास्त्राचे धडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून पुरातत्त्व शास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ३१ मे रोजी पार पडलेल्या विद्वत परिषदेने या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून आता विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवे दालन मुंबई विद्यापीठाने खुले करून दिले आहे आणि लवकरच आता विद्यापीठात पुरातत्त्वशास्त्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी शुक्रवारी केली.
देशमुख यांनी बहि:शाल विभागाने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल विभागप्रमुख डॉ. मुग्धा कर्णिक यांचे अभिनंदन करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्षीय पूर्णवेळ पुरातत्त्व अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होत असल्याचा विशेष आनंद होत असून ही नक्कीच भूषणावह बाब असून पुरातत्त्व अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात नक्कीच उल्लेखनीय बाब असल्याचे देशमुख यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून व पुरातत्त्व शास्त्रातील विशेषज्ञ म्हणून ख्याती प्राप्त असलेले प्रा. डॉ. संकालिया यांचा पुरातत्त्व शास्त्रातील कार्याबद्दल विशेष गौरव होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीने येत्या नजीकच्या काळात या विभागाची स्वतंत्र रचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागामार्फत २००६-०७ साली या अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवत विभागामार्फत ‘सर्टिफिकेट कोर्स’ म्हणून या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या अभ्यासक्रमाची सुरुवात ‘वीकेण्ड कोर्स’ म्हणून झाली. यानंतर हळूहळू अभ्यासक्रमाची पाळेमुळे विस्तारित होत गेली आणि आज प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम पूर्णवेळ दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून विद्यापीठात सुरू होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे विभागाच्या संचालिका डॉ. मुग्धा कर्णिक यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या सर्टिफिकेट अभ्यासक्रमानंतर पुढील पदवीचे शिक्षण म्हणून विद्यार्थी एक तर डेक्कन कॉलेज किंवा विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे, त्यामुळे या अभ्यासक्रमाची वाढती मागणी लक्षात घेता हा अभ्यासक्रम विद्यापीठातच सुरू व्हावा या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी ६० प्रवेशित विद्यार्थीसंख्या असून एकूण ४ सत्रांत या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. १५ जून २०१७ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Web Title: Lessons of Archeology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.