ऑगस्ट क्रांती मैदानाकडे सत्ताधा-यांची पाठ
By admin | Published: August 9, 2015 01:30 PM2015-08-09T13:30:38+5:302015-08-09T13:30:38+5:30
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे. क्रांतीदिनी ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहून मानवंदना अर्पण करण्याची परंपरा आहे, मात्र विद्यमान सरकारला हुतात्म्यांचा विसर पडल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
महात्मा गांधीजींनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून १९४२ मध्ये ब्रिटिश सरकार चले जाव- छोडो भारत असा इशारा दिला होता. या मैदानात ९ ऑगस्ट रोजी हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. आज सकाळपासून विविध समाजसेवी संघटनांचे कार्यकर्ते, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र दुपारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री मैदानाकडे न फिरकल्याने नाराजी व्यक्त होत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होत आहे, ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र विद्यमान सत्ताधा-यांनी ही परंपरा मोडणे दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.