काेराेना मृत्युदर राेखण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ज्ञ देणार धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:31 AM2021-02-12T03:31:30+5:302021-02-12T03:32:20+5:30
जिल्ह्यातील अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- स्नेहा मोरे
मुंबई : राज्यातील कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ जिल्ह्यातील अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात येणार असून याअंतर्गत कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञ सर्व जिल्ह्यांना भेट देतील. प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेऊन त्यानुसार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात येईल.
राज्यातील जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणासाठी खासगी-सरकारी रुग्णालयातील विशेषज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचा मृत्युदर सध्या २.५ टक्के आहे. मात्र सांगली, सातारा, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती या जिल्ह्यातील मृत्युदर अधिक असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने मांडले.
राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले, सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी जिल्हा आणि मनपा या स्थानिक यंत्रणांना मृत्यू संख्या, मृत्युदर आणि मृत्यू विश्लेषण अहवाल तयार करणे बंधनकारक आहे. त्यानुसार, जिल्हा व मनपा प्रशासनाला याविषयी सूचना देण्यात आली आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्युदर हा एकूण राज्याच्या मृत्युदरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे.
कृती आराखडा तयार करण्यावर भर
टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाविषयी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यांमधील लहान-लहान केंद्रातील मनुष्यबळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. केंद्राच्या वतीने राज्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या चमूने प्रशिक्षणाचे निर्देश दिले होते, त्यानुसार हे आयोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.