पीककर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:40 AM2017-07-18T01:40:54+5:302017-07-18T01:40:54+5:30
थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे.
- राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने या कर्जासाठी मागणी केलेली नाही. खरीप पेरणीचा हंगाम संपत आला आहेच पण त्याबरोबर या कर्जासाठी बाँड द्यावा लागत असल्याने प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
राज्य सरकारने जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे दहा हजार रुपये बियाणे व खते खरेदीसाठी देण्याचे आदेश जिल्हा बँका व राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे कोट्यवधी रुपये बँकेत पडून असल्याने सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दहा हजार रुपये देण्यास आढेवेढे घेतले; पण सरकारने समज दिल्यानंतर रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला; पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने या रकमेची उचल केलेली नाही.
गेल्या आठवड्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील विभागीय सहनिबंधक, व जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, कोकण विभागातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणात कर्जाची उचल केली आहे.
- पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून दहा हजार उचलीला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. १५ जुलैपर्यंत उर्वरित विभागातून केवळ २२०० शेतकऱ्यांनीच कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले आहे.