गिरवले वैज्ञानिकतेचे धडे

By Admin | Published: March 1, 2017 01:24 AM2017-03-01T01:24:48+5:302017-03-01T01:24:48+5:30

वैज्ञानिक संस्थांमध्ये विज्ञान दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना हजारो विद्यार्थी व विज्ञानप्रेमींनी हजेरी लावली

The Lessons of the Grounded Scientist | गिरवले वैज्ञानिकतेचे धडे

गिरवले वैज्ञानिकतेचे धडे

googlenewsNext


पुणे : आयुका, सी-डॅक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शैक्षणिक व वैज्ञानिक संस्थांमध्ये विज्ञान दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना हजारो विद्यार्थी व विज्ञानप्रेमींनी हजेरी लावली. ग्रह, तारे, गुरुत्वीय लहरी, आकाशगंगा, गुरुत्वाकर्षण, मानवी शरीराची रचना, अन्नसाखळी यांच्यासह दूर्बिणीचे विविध प्रकार उपग्रह, रोबोट आदींची माहिती घतेली. तसेच तज्ज्ञांकडून वैज्ञानिक संकल्पना समजावून घेतल्या.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयुका सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे पुणे शहरासह राज्यातील व राज्याबाहेरील विज्ञानप्रेमींनी व विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच आयुकातील विविध सभागृहांत गर्दी केली होती. सूर्यावरील डाग, गुरुत्त्वीय लहरींबरोबच न्यूटन, गॅलिलिओ, आईनस्टाईन आदी शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी या उद्देशाने अनेक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना आयुकातील विज्ञान प्रदर्शन दाखवण्यासाठी आणले होते. विद्यार्थी विविध प्रयोग करून पाहण्यात दंग झाले होते. तसेच विज्ञानातील विविध संकल्पना समजून घेऊन तज्ज्ञांना प्रश्नही विचारत होते.
आयुकातील शास्त्रज्ञांबरोबरच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्पही आयुकाच्या परिसरात ठेवण्यात आले होते. शामराव कलमाडी हायस्कूलच्या सुमुख के. एस., वेदांत भागवत, देवेन शहा, अनिकेत मरे, रितेश हेगडे या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘व्हॅक्युम डस्टर’ पाहण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच बावधान येथील चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयातील रितेश कांबळे, कृष्णकांत राऊत, मयूर पवळे या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेला रोबोट हा प्रकल्प सादर केला. केळेवाडी येथील अभिनव विकास फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांची उत्सुकतेने माहिती घेतली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील सी-डॅक संस्थेमधील परम संगणकाविषयी विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. तसेच संगणकाचा सर्व क्षेत्रातील वाढलेला वापर जाणून घेतला. तसेच विद्यापीठाच्या क्लासरूम कॉम्प्लेक्समध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यास सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. लहान-लहान वस्तूंपासून तयार केलेल्या वैज्ञानिक वस्तूच्या माध्यमातून विद्यापीठातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना विविध संकल्पना समजावून सांगितल्या.
(प्रतिनिधी)
>विज्ञानाविषयी शाळेत मिळणाऱ्या माहितीपेक्षा विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती घेता आली, याचे खूप समाधान वाटते. पृथ्वी पलीकडच्या विश्वाला अनुभवताना मज्जा आली. शाळेत फक्त शास्त्रज्ञांबद्दल माहिती दिली जाते. तसेच पुस्तकात ही माहिती वाचायला मिळते. मात्र, आयुकाच्या आवारातील शास्त्रज्ञांचे पुतळे पाहून मला खूप आनंद झाला.
- अनिकेत मदने, विद्यार्थी
>अनेक प्रकारच्या दुर्बिणी, ताऱ्यांशी झालेली ओळख आणि विविध प्रकल्प पाहता आज मज्जा आली. महाविद्यालयात अनेकदा विज्ञानातील घडामोडींविषयी फक्त चर्चा होते. या प्रदर्शनातून विज्ञानाच्या विविध तंत्रज्ञानाशी ओळख झाली.
- धनंजय महानुभव, विद्यार्थी

Web Title: The Lessons of the Grounded Scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.