मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे खडसेंसह समर्थकांची पाठ
By admin | Published: October 16, 2016 04:47 PM2016-10-16T16:47:54+5:302016-10-16T16:47:54+5:30
जामनेर येथील कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित असलेल्या माजीमंत्री एकनाथ खडसे
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 16 - जामनेर येथील कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित असलेल्या माजीमंत्री एकनाथ खडसे व समर्थकांनी जामनेर येथील कार्यक्रमाकडे मात्र पाठ फिरवली. यावेळी विमानतळावरील विश्रामगृहात मुख्यमंत्री फडणवीस व खडसे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. त्यावेळी खडसेंनी महाजनांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मात्र याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधला असता जामनेरच्याकार्यक्रमाला जाणार नसल्याचे आधीच सांगितलेले होते. नाराजी व्यक्त करण्याचा विषयच येत नाही, असे त्यांनी‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री दौऱ्याच्या नियोजनासाठी भाजपाची बैठक शनिवारी पार पडली. त्यात खडसे समर्थकांनी गोंधळ घालत नाराजी व्यक्त केली होती. तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाही दिल्या होत्या. त्यामुळे रविवारी विमानतळावर व जामनेरच्या कार्यक्रमाला खडसे समर्थक येतात का? तसेच मुख्यमंत्र्यांसमोर काही शक्तीप्रदर्शन होते का? अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र रविवारी विमानतळावर खडसे यांच्यासह आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी जळगाव विमानतळावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या विमानाने अगदी वेळेवर दुपारी १२ वाजता लँडींग केले.
सर्वात प्रथम जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी हात जोडून नमस्कार करीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर आमदार एकनाथराव खडसे, आमदार भोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर उर्वरीत आमदार, पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. धावपट्टीपासून निम्मे अंतर पोहोचले असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यांनी निम्मे अंतर जाऊन स्वागत केले. त्यानंतर विमानतळावरील विश्रामगृहात महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक कैलास सोनवणे, अमर जैन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस व खडसे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. यावेळी निमंत्रण पत्रिकेचा वाद तसेच महाजन यांची खडसे विरोधकांशी असलेली जवळीक या विषयावर मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मात्र खडसे यांना याबाबत विचारणा केली असता नाराजी व्यक्त करण्याची ती जागा नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाजन यांचे आवाहन
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच खडसे यांना तुमचे कार्यक्रमात स्वागत आहे. तुमचे भाषणही ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला चला, असे आवाहन केले. मात्र त्यावर खडसे यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनीही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याचे समजते. त्यानंतर मुख्यमंत्री दालनाच्या बाहेरच उभ्या असलेल्या मराठा मोर्चातील महिला व मुलींच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी बाहेर आले. शिष्टमंडळाशी चर्चा करून व कोपर्डी प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र आरक्षणाच्या डेडलाईनबाबत मात्र त्यांनी स्मितहास्य करीत बोलणे टाळले. मात्र त्यामुळे शिष्टमंडळाने मात्र मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय हसण्यावारी नेल्याचा आरोप नंतर पत्रकारांशी बोलताना केला. यावरून आरक्षणाबाबत मुख्यमंत्री गंभीर नाहीत, असा आरोपही केला.
खडसे समर्थकांची पाठ
मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे कार्यक्रमासाठी जामनेरकडे वाहनाद्वारे रवाना झाले. मात्र आमदारांनी हॉलमध्येच थांबावे असे आवाहन यावेळी काही कार्यकर्त्यांकडून केले जात होते. खडसे यांच्यासह आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवित खडसे यांचा बंगला गाठला.
-----
कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या मुली, महिलांचे शिष्टमंडळ बाहेर भेटीसाठी उभे आहे. त्यांच्याशी दोन मिनिटे चर्चा करावी, असे मुख्यमंत्र्यांशी बोललो. नाराजी व्यक्त करण्याची ती जागा नव्हतीच. तसेच कार्यक्रमाला जमणार नाही, हे आधीच गिरीश महाजन यांना सांगितले होते. त्यामुळे नाराजीचा विषय नाही.
-आमदार एकनाथराव खडसे.
----
पक्षाचा कार्यक्रम नव्हता. शासकीय कार्यक्रम होता. त्यामुळे कार्यक्रमाला गेलो नाही. मुख्यमंत्र्यांचे विमानतळावरच स्वागत केले. कुणावर नाराजीचा विषय नाही
-आ.डॉ.गुरूमुख जगवाणी.