'गद्दार' शब्दावरून एकाच वाक्यात मुख्यमंत्री शिंदेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:14 PM2022-07-21T14:14:49+5:302022-07-21T14:15:13+5:30
आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई - जी युती अडीच वर्षापूर्वी घडायला हवी होती ती आम्ही घडवली, हे सरकार कायदेशीर आणि घटनेनुसारच बनवलं आहे. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ च्या निवडणुकीत आम्ही पुन्हा निवडून येऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आदित्य ठाकरेंना जे बोलायचं ते बोलू द्या असा खोचक टोलाही शिंदे यांनी आदित्य यांना लगावला आहे.
शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गोरेगावच्या निवासस्थानी पोहचले होते. मुख्यमंत्र्यांनी किर्तीकर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांना शिंदे म्हणाले की, किर्तीकर यांचे अलीकडेच ऑपरेशन झाले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय. राज्यातील जनतेला आमची भूमिका पटली आहे. जी भूमिका बाळासाहेबांची होती. ते आम्ही आत्मसात केलंय, जे अडीच वर्षापूर्वी घडायला हवं होतं ते आम्ही आता केले असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे. बाळासाहेबांची परखड भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय. सरकार लोकांनी निवडून दिलेले असते. विधानसभा, विधान परिषदेत आमच्याकडे बहुमत आहे. हा वाद न्यायालयात आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे. कोर्टाने त्यांची एकही मागणी मान्य केली नाही. ज्यांना स्वत:चं समाधान करून घ्यायचं ते त्यांना घेऊ द्या. घटनेच्या तरतुदीनुसार जे जे फॉलो करायचं ते पूर्ण केले आहे. अडीच वर्ष कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ मध्येही आम्हीच निवडून येणार आहोत असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले.
त्याचसोबत मला गद्दारी केलेल्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. जरा लोकांमध्ये फिरा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. जे गेलेत त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. बंड किंवा उठाव करायला ताकद लागते. तुम्ही केलेला उठाव नाही. गद्दारीच आहे. हिंमत असती तर राज्यात थांबून बंड केलं असतं. हिंमत असती तर इथून सूरतेला पळाले नसते. तिथं गुवाहाटीला जाऊन ४० आमदार मजा मारुन आले. तुमच्यात थोडीशीही लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा", असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.