एकला चलो रे
By admin | Published: October 16, 2016 01:36 AM2016-10-16T01:36:05+5:302016-10-16T01:36:05+5:30
खरेतर, एकांतात रमणाऱ्या व्यक्तींना एक सुरेख मानवी स्वातंत्र्य मिळते. हे स्वातंत्र्य असते विचारांचे, तत्त्वाचे व नैतिकतेचे. यामुळेच ही काय बरेच शास्त्रज्ञ अंतर्मुख असतात.
- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर
खरेतर, एकांतात रमणाऱ्या व्यक्तींना एक सुरेख मानवी स्वातंत्र्य मिळते. हे स्वातंत्र्य असते विचारांचे, तत्त्वाचे व नैतिकतेचे. यामुळेच ही काय बरेच शास्त्रज्ञ अंतर्मुख असतात. एकांतात प्रयोग करतात आणि शास्त्रातले अनेक उच्चत्तम शोध लावतात. एकांतात रममाण होणाऱ्या व्यक्तीचा स्वत:चा व्यक्तिमत्त्वाचा विकाससुद्धा अलौकिक असतो; किंबहुना त्यांचा स्वत:तील विधायकता, कलात्मकता, शास्त्रीय दृष्टी व नैतिक दृष्टीकोन सर्वच बाबतीत एक खास विश्लेषणात्मक आविष्कार असतो. जगाच्या आचारविचारांनी प्रभावित न होता विशुद्ध संस्कार व्यक्तीत दिसतो. स्वत:ची निर्मळ ओळख होते म्हणून त्यांच्या मनाचा समतोल अभंग असतो. एकांतवासात या व्यक्ती प्रगल्भ चिंतनशीलतेसाठी वेळही देऊ शकतात. आत्मपरीक्षणाने या व्यक्तींचा आध्यात्मिक विकास होतो.
सामाजिकदृष्ट्या एकाकी पडलेल्या व्यक्तीला आत्मविश्वास नसतो. त्यांना स्वत:बद्दल कमीपणा वाटतो. त्या कुठल्याही नकारात्मक सामाजिक प्रसंगात स्वत:ला असाहाय्य वा निरर्थक समजातात. कधी त्या स्वत:च्या कोषात पूर्णपणे अडकतात तर कधी भरकटत जातात. अर्थपूर्ण अशी भावनिक नाती या व्यक्तींना जगता येत नाहीत. सामाजिक नाती तर जोडताही येत नाहीत; पण त्याचवेळी समाज आपला धिक्कार तर करणार नाही अशी भीतीही वाटते. एकीकडे अशा व्यक्ती आहेत तर काही व्यक्ती अशाही आहेत की त्यांना आपण आयुष्यात कधीतरी एकांत अनुभवला पाहिजे असे ठामपणे वाटते. हा एकांत तात्त्विक व सात्त्विकही असतो. आपण एकटे असणे वा एकांतात असणे या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक राजे महाराजे जेव्हा जेव्हा गंभीर निर्णय घ्यायची वेळ येई तेव्हा तेव्हा जगजाहीर करून एकांतात जात. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ किंवा टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला ‘गीतारहस्य’ हे या रचलेल्या विधायक कार्याची उत्तम उदाहरणे आहेत. संतांच्या एकांतवासाच्या संकल्पनेत अंतर्मनाशी एकरूप होणाऱ्या निर्मळ आनंदाचा उदात्त विचार आहे. ऐहिक विश्वात आनंदाची संकल्पना बाह्य गोष्टींवर, संपत्तीवर वा सामाजिक प्रतिष्ठेवर व मानापमानावर अवलंबून असते. पण जे मौनात वैश्विक आनंद मिळवतात त्या आनंदाची बैठक आध्यात्मिक असते. मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून अंतर्मुख असणाऱ्या व्यक्तीला जगाच्या हल्लाबोल्यापासून दूर जाऊन आत्मनिरीक्षण करत स्वत:ची आत्मिक ऊर्जा वाढविण्यात समाधान मिळते. एकांत ही नकारात्मक कल्पना नाही. इतर लोकांना सामाजिक गुंतागुंतीमुळे ज्या मर्यादा येतात त्या एकांतात आत्मरत होणाऱ्या व्यक्तींना येत नाही. सामाजिक व पारंपरिक नात्यांमध्ये दुसऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे वागणे किंवा बऱ्याच वेळा ती नाती टिकवण्यासाठी खूप तडजोड करावी लागते.
सर्वसामान्यपणे माणसाचे विचार व कृती भोवतालच्या वातावरणातून घडतात. त्यामुळे त्यांच्यावर बाह्य गोष्टींचा प्रभाव अधिक असतो. स्वत:च्या दुनियेला जाणून घेणारी व्यक्ती बाह्य जगाच्या अयोग्य व नकारात्मक प्रभावातून मुक्त असते. म्हणूनच तिच्या विचारांचा प्रवाह व वेळेची गुंतवणूक अंतर्मुख विधायकतेत परिपक्व होत असते.
महत्त्वाचे म्हणजे एकांताचा अतिरेक होऊनही चालत नाही. स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाला जोपासून जगाशी योग्य व आवश्यक नाते जोडायला लागते. एक प्रामाणिक व वस्तुनिष्ठ मानवी नाते एकांतवासासाठी आवश्यक प्रेरणा आहे. त्या मनालाही प्रेरणा लागते. तेही उत्तेजित व्हायला लागते. तसे झाले नाही, तर एकांतवास म्हणजे माणसाला एकटेपणाचा शाप भोगायला लागेल. या शापात मानसिक समस्या होतील. भगवान बुद्धांनी ध्यान केले, सर्व ऐहिक सुखांचा परित्याग केला. एकांतवासात सर्व जगाला सखोल अनुभवले. विश्वातील दु:ख, यातनांवर मात करण्यासाठी त्यांनी बोधी मिळवली व जगाला प्रकाश दाखवला. रवींद्रनाथ टागोरांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेला प्रेरणा देत ‘तोबे एकला चलो रे’ म्हणून एक सुंदर कविता लिहिली. कोणी तुम्हाला साद घालो ना घालो, कोणी तुमच्याबरोबर चालो किंवा न चालो; मात्र एकटे चला. एकांताचा आनंद प्रत्येकानं खरं घ्यायला हवा.