कुणी कुणालाही भेटू द्या, येतील तर नरेंद्र मोदीच!; फडणवीसांचा पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 07:28 AM2021-06-13T07:28:37+5:302021-06-13T07:29:27+5:30
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुणी काहीही केले तरी लोकांच्या मनावर मोदी राज करतात. त्यामुळे कुणी सोबत येवो, काहीही रणनीती आखू द्या, काहीच फरक पडणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या भेटीला विशेष महत्त्व दिलेले नाही. भारतात लोकशाही आहे. कुणी कुणाची भेट घ्यावी यावर कुणाचे बंधन नाही. कुणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केल्या तरी आजही मोदी आहेत व २०२४ मध्येही मोदींच्याच नेतृत्वात सरकार येईल, असा चिमटा फडणवीस यांनी काढला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुणी काहीही केले तरी लोकांच्या मनावर मोदी राज करतात. त्यामुळे कुणी सोबत येवो, काहीही रणनीती आखू द्या, काहीच फरक पडणार नाही.
भाजपचे नेते आधीपासून मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी आहेत. राज्यात आमचे सरकार असतानाही भाजपचे अनेक नेते मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे यावेळीही होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वारकऱ्यांच्या मागणीचा विचार करायला हवा
पंढरपूरसाठी कमी उपस्थितीची पायी वारी करणे शक्य होते. वारकऱ्यांनी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची मागणी केली होती. गावकऱ्यांनी ठराव केले होते की वारीदरम्यान कुणी रस्त्यावर येणार नाही. असे असताना सरकारने वारकऱ्यांच्या मागणीचा विचार करायला हवा होता, असेही त्यांनी सांगितले.