बळीराजा सुखी होऊ दे!
By admin | Published: July 28, 2015 04:25 AM2015-07-28T04:25:21+5:302015-07-28T04:25:21+5:30
‘राज्यात चांगला पाऊस पडू दे, आमचा शेतकरी, सामान्य माणूस सुखी होऊ दे, सर्वसामन्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे पंढरीनाथाला घातले
- सचिन कांबळे, पंढरपूर
‘राज्यात चांगला पाऊस पडू दे, आमचा शेतकरी, सामान्य माणूस सुखी होऊ दे, सर्वसामन्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे पंढरीनाथाला घातले असून, ते निश्चित पूर्ण होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.
आषाढीच्या महासोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांनी केली. या पूजेनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मागील काही दिवसांत पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. जरी दुष्काळाची परिस्थिती आलीच तर, आमचे सरकार तयारीत आहे. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने उपस्थित होते.
१६ वर्षांपासून वारी
राघोजी धांडे हे गेल्या १६ वर्षांपासून पायी यात्रा करतात. आम्हाला विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळेल, असे वाटले नव्हते. मुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय पूजेचा मान मिळाल्याचे सांगताच आम्हाला फारच आनंद झाल्याचे राघोजी धांडे यांनी सांगितले.
हिंगोलीच्या दाम्पत्याला पूजेचा मान
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा करण्याचा मान ‘मानाचे वारकरी’ म्हणून संगीता व राघोजी नारायण धांडे (पिंपरी खुर्द, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) या दाम्पत्याला मिळाला. या वेळी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांनी मानाच्या वारकऱ्यांना एसटी बसचा वर्षभराचा मोफत पास देऊन सत्कार केला.
दुष्काळी लढ्यासाठी सज्ज
महाराष्ट्रातील अनेक यात्रेकरू अमरनाथ यात्रेमध्ये अडकले आहेत. या यात्रेकरूंची माहिती घेण्यासाठी राज्यातून दिल्लीला दोन अधिकारी पाठविले आहेत. ते माहिती घेऊन यात्रेकरूंना सुखरूप घरी पोहोचवतील. राज्यात दुष्काळ निर्माण झाल्यास त्यासाठी सरकारने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
कृत्रिम पावसाची तयारी
-कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारची सर्व यंत्रणा सज्ज आहे. यासाठी विमान आले आहे. औरंगाबादमध्ये संभाजीनगरला रडार व इतर सर्व यंत्रणा कार्यरत आहे. दोन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास, हवामान खात्याकडून सूचना घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.