कळी उमलू द्या..!

By admin | Published: February 7, 2017 12:44 AM2017-02-07T00:44:10+5:302017-02-07T00:44:10+5:30

-- सिटी टॉक

Let the blossom flow ..! | कळी उमलू द्या..!

कळी उमलू द्या..!

Next


सोशल मीडियामध्ये सध्या एक फोटो खूप व्हायरल झाला आहे. हैदराबादच्या सुरेन नावाच्या व्यक्तीने टिष्ट्वटरच्या माध्यमातून एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात एक चिमुकला अर्धवट झोपेत आणि खिशात पराठा खोसलेल्या अवस्थेत शाळेच्या प्रार्थनेसाठी हात जोडून उभा आहे. सुरेनने या पोस्टमध्ये मानव संसाधन मंत्रालय व तेलंगणाचे मंत्री के. टी. रामराव यांना टॅग करून विचारले की, खिशात सकाळचा नाष्टा, अधुरी झोप....शाळेची वेळ १० ते सं. ५:३० का नाही? कृपया विचार करा. हे टिष्ट्वट फार व्हायरल झाले. मंत्री रामराव यांनी म्हटले, मी आपल्या मताशी सहमत आहे. मुलांसाठी बालपण गरजेचे आहे...असे तणावपूर्ण वातावरण योग्य नाही. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीस हा फोटो हादरवून टाकतो. मुलांचं भविष्य (ज्याबाबत आपल्याला माहिती नाही) सुरक्षित करण्याच्या नादात आपण त्यांचं बालपण तर हिरावून घेत नाही आहोत ना?
काही वर्षापूर्वी आलेला ‘थ्री इडियट’ चित्रपट सर्वांना आठवत असेलच. यात इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य असलेल्या वीरू सहस्त्रबुद्धे ऊर्फ व्हायरस याचे आयुष्याचे एकच तत्त्वज्ञान असतं. ‘लाईफ इज अ रेस!, अगर तेज नही भागोगे तो कोई तुम्हे कुचलकर आगे निकल जायेगा’ या तत्त्वज्ञानाने त्याच्या मुलाचा बळी गेला तरी तो आपल्या मतावरच ठाम. जीवन जगण्याची ही ईर्ष्या, आसुया आपण नकळत बालमनावर पेरत असतो, पुढे जाऊन तेच उगवतं आणि आयुष्याच सूत्रच बनतं. या सूत्राभोवती फिरलेलं आयुष्य शेवटच्या टप्प्यावर आलं की आपल्या लक्षात येतं खरं जीवन जगायच राहूनच गेलं. यासाठी जीवन जगताना प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवली पाहिजे ती खिलाडीवृत्ती. शिखर धवनपेक्षा विराट कोहली ज्युनिअर, पण शिखरच्या छाताडावर पाय ठेवून आज तो टीम इंडियाचा कर्णधार बनलाय. पण, दोघे मैदानात असताना त्यांच्यात सीनिअर-ज्युनिअर असा भेद दिसत नाही, दोघे एका संघाचा भाग म्हणून खेळतात. सुरेश रैना कोहलीच्या आधी टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार होता; पण त्यालाही विरासत टिकविता आली नाही. तेथेही कोहलीने बाजी मारली; पण म्हणून रैनाच्या मनात विराटविषयी कटुता नाही यालाच म्हणतात ‘खिलाडूवृत्ती’. तुमच्या आमच्या भाषेत ‘स्पोर्टिंगनेस’. खिलाडूवृत्ती हा खेळाचा आत्मा असला तरी वैयक्तिक आकांक्षेला लगाम घालत मनातील वैषम्याच्या भावनेला दाबायचे किती आणि कसे? हे खेळाडूंना जमते, मग तुम्हा आम्हाला सामान्य जीवनात का जमत नाही? याचे कारण म्हणजे लहानपणापासून आपल्यावर बिंबवलेलं ‘लाईफ इज अ रेस!...’चं तत्त्वज्ञान.
शेजाऱ्याने कार घेतली तर त्याला जाऊन शुभेच्छा देणं दूरच उलट आपण खिडकी बंद करून घेतो. आॅफिसमधील आपल्या सहकाऱ्याचे बॉसने जरा कौतुक केलं की आपला जळफळाट झालाच म्हणून समजा. त्याच्याविषयी मग गॉसिपिंग सुरूहोतं. त्याला इतकं एकटं पाडलं जातं की, आपण चांगलं काम करून गुन्हा केला की काय अशी त्याची भावना बनते. हीच प्रवृत्ती आजकाल थोड्याफार फरकाने सगळीकडे दिसते. मग या खेळाडूंचा आदर्श घेऊन आपण आपल्या मुलांवर लहानपणापासूनच खिलाडूवृत्तीचे संस्कार का बिंबवत नाही? मुलाला या जीवघेण्या रेसचे घोडे बनविणार आहोत की, चांगला माणूस बनविणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.


- विश्वास चरणकर

Web Title: Let the blossom flow ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.