स्वप्न सत्यात उतरावे, हेच ईश्वराला साकडे
By admin | Published: January 18, 2016 03:19 AM2016-01-18T03:19:24+5:302016-01-18T03:19:24+5:30
मी एक स्वप्न पाहिले आहे, ज्ञानाधिष्ठित आणि विज्ञानाधिष्ठित समाजाचे, ते सत्यात उतरावे. अशी इश्वराकडे प्रार्थना करणार आहे.
संजय माने, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
मी एक स्वप्न पाहिले आहे, ज्ञानाधिष्ठित आणि विज्ञानाधिष्ठित समाजाचे, ते सत्यात उतरावे. अशी इश्वराकडे प्रार्थना करणार आहे. माझे वय ७३ वर्षे आहे. शास्त्रज्ञ असूनही भावूक होऊन देवाकडे मागणे मागतो. देवा माझे यापुढचे सर्व आयुष्य घे, परंतू मला त्यातील केवळ एकच दिवस दे, त्या दिवशी मला या देशात माझे स्वप्न साकारल्याचे पाहता येईल. त्यांच्या या वाक्यवर काही क्षणात सर्वजण जागेवर उभे राहिले. नकळत जणूकाही त्यांना मानवंदनाच देण्यात आली.
पिंंपरीत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. सागर देशपांडे आणि डॉ. अभय जेरे यांनी घेतली. बालपण, ते संशोधन क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, बिकट परिस्थितीतवर जिद्दीने केलेली मात, असा आयुष्याच्या विविध टप्यांवरील जीवनपट त्यांच्या मुलाखतीतून उलगडला. ‘गांधीयन इंजिनिअरिंग’ ही आपण मांडलेली संकल्पना काय आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फायदा केवळ श्रीमंत वर्गालाच नव्हे तर गरिबातल्या गरिबाला झाला पाहिजे. असा या संकल्पनेमागील मूळ उद्देश आहे. उच्च तंत्रज्ञान स्वस्तात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. हिच अपेक्षा गांधीयन इंजिनिअरिंग संकल्पनेत दडली असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. आपण जिंकू शकतो, हिच भावना बाळगली जात नाही.आजवर आपण अमेरिका, जपान या देशांशी तुलना करत होतो. आपणही संशोधन आणि अन्य क्षेत्रात आपण मागे नाही. हे हळदीच्या आणि बासमती तांदळाच्या पेटंट लढयाने दाखवून दिले आहे.