चारा छावण्या बंद करू द्या !
By admin | Published: May 1, 2016 12:49 AM2016-05-01T00:49:07+5:302016-05-01T00:49:07+5:30
दोन महिन्यांचे पैसे शासनाकडे बाकी राहिल्याने आता छावणी चालकांनी छावण्या बंद करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. छावणी चालवण्याची क्षमता नव्हती, तर
- व्यंकटेश वैष्णव, बीड
दोन महिन्यांचे पैसे शासनाकडे बाकी राहिल्याने आता छावणी चालकांनी छावण्या बंद करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. छावणी चालवण्याची क्षमता नव्हती, तर मग चालविण्यास का घेतल्या, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
पाच महिन्यांत ४५ कोटींचा खर्च जनावरांच्या चारा-पाण्यावर झाला आहे. आजघडीला जिल्ह्यात एकूण २७७ छावण्यांमधून सव्वातील लाख जनावरे छावणीच्या आश्रयाला आहेत. मागील दोन महिन्यांचा छावण्यांचा निधी शासनाकडे अडकलेला आहे. दोन हजार जनावरे असलेल्या छावणीवर दिवसाला ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. अशा स्थितीत मागील दोन महिन्याचे पैसे शासनाने न दिल्याने छावणी सम्राट अडचणीत सापडले आहेत. आगामी पावसाळ्यापर्यंत जनावरांच्या चारापाण्यासाठी
५० कोटींची मागणी आहे. छावण्या बंद करण्यास परवानगी मागणाऱ्यांमध्ये आष्टी तालुक्यातील सर्वाधिक छावणी चालकांचा समावेश आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चाललेला आहे. अशा स्थितीत छावणी बंद करता येणार नाहीत, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
उद्देशावर प्रश्नचिन्ह
छावणीचालकांनी आपल्या सेवाभावी संस्थेवर छावण्यांची मंजुरी घेतलेली आहे. पशुमालक अडचणीत असताना २७७ पैकी ११३ छावणी चालकांनी छावणी बंद करण्याची मागणी करणे म्हणजे सुरूवातील छावण्या सुरू करण्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाने उपस्थित केला आहे.
बिकट परिस्थितीत छावणी बंद करता येणार नाही. असे कोणी केले तर संबंधित संस्था काळ्या यादीत टाकून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, बीड