गणेशोत्सव काळामध्ये कार्यकर्त्यांना जुगार खेळू द्या; आमदार, खासदारांची पोलिसांना अजब सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 02:57 AM2017-08-24T02:57:37+5:302017-08-24T09:04:44+5:30
‘गणेश मंडळासमोर रात्री मूर्तीचे रक्षण करणा-या कार्यकर्त्यांना टाइमपाससाठी पत्ते, जुगार खेळण्यास सूट द्या... कोणी खेळत असल्यास दुर्लक्ष करा... जुगारातून मिळालेल्या पैशांतून नोटाबंदीमुळे अडचणीत आलेल्या गणेश मंडळांचा खर्च भागवा
औरंगाबाद : ‘गणेश मंडळासमोर रात्री मूर्तीचे रक्षण करणा-या कार्यकर्त्यांना टाइमपाससाठी पत्ते, जुगार खेळण्यास सूट द्या... कोणी खेळत असल्यास दुर्लक्ष करा... जुगारातून मिळालेल्या पैशांतून नोटाबंदीमुळे अडचणीत आलेल्या गणेश मंडळांचा खर्च भागवा... अशा धक्कादायक सूचना भाजपा व शिवसेना या सत्ताधारी पक्षातील आमदार-खासदारांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केल्याने पोलीस आयुक्तांसह सगळेच आवाक् झाले.
गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त पोलीस आयुक्तालयाने बुधवारी तापडिया नाट्यमंदिरात शांतता समिती बैठक आयोजित केली होती. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त
डी. एम. मुंगळीकर, धर्मादाय उपआयुक्त विवेक सोनुने यांच्यासह शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी होते. पोेलीस आयुक्तांना सूचना देताना भाजपाचे आ. अतुल सावे म्हणाले, ‘गणेशोत्सव काळात गणेशमूर्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांप्रमाणेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही आहे. रात्रीच्या वेळी मंडळाचे कार्यकर्ते गणेशमूर्तीचे रक्षण करण्यासाठी जागत असतात. काही जण टाइमपास म्हणून पत्ते खेळत असतात. त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. पोलिसांनी या कार्यकर्त्यांकडे थोडा कानाडोळा करावा. त्यांना जुगार खेळू द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली. तर शिवसेनेचे आ. संजय शिरसाट यांनी, ‘कार्यकर्त्यांनी पत्ते खेळावेत; पण त्यात जास्त पैसे लावू नयेत. कारण, मोठी रक्कम आली की, कार्यकर्त्यांमध्ये भांडणे होतील, त्यातून मारामारीपर्यंत प्रकरण वाढेल. यासाठी पत्ते खेळा; पण कमी पैसे लावा,’ असा सल्ला दिला.
शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी तर अजब सल्ला दिला. ते म्हणाले, नोटाबंदीमुळे लोक वर्गणी देण्यास तयार नाहीत. यामुळे गणेश मंडळांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. कायदा कडक झाल्याने मी कार्यकर्त्यांना म्हणणार नाही की, पत्ते खेळा; पण रात्री मूर्तीच्या रक्षणासाठी जागर करीत असाल तर पत्ते खेळा; पण जुगारात मिळालेला पैसा स्वत:वर खर्च न करता त्यातून गणेशमंडळाचा खर्च भागवा! आमदार-खासदारांच्या या सल्ल्यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
शांतता समितीच्या बैठकीत एका महिलेने गणेश मंडळासमोर डीजे वाजविण्यास परवानगी देऊ नये अशी सूचना केली. मंडळाशेजारील घरात आजारी व्यक्ती, लहान मुले असतात. त्यांना याचा त्रास होतो, या सूचनेचे अनेकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले; पण आ. इम्तियाज जलील म्हणाले की, ‘मॅडम, गणेशोत्सव वर्षातून एकदाच येत असतो. यावेळी गाणे वाजविणे, जल्लोष करणार नाही, तर कधी करणार. गणेश मंडळांना डीजे वाजवू द्या, जोरात वाजवू द्या’.
जुगार चालणार नाही
गणेश मंडळांसमोर जुगार खेळण्याऐवजी मनोरंजनासाठी कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ, चायनीज ट्रेकर, लुडो, असे विविध प्रकारचे गेम खेळावेत. एवढेच नव्हे, तर संगीत गाणी ऐकावीत. इनडोअर गेम खेळता येऊ शक तात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जुगाराकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.
- यशस्वी यादव,
पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर.