Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: होऊन जाऊद्या! ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदेंना; स्वत:च्या नावाची उद्धव ठाकरेंना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:30 AM2022-10-11T06:30:19+5:302022-10-11T06:31:22+5:30
shiv sena's New Names: आयोगाचे हंगामी आदेश; ठाकरे गटाला लढवावी लागेल ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाने निवडणूक , ठाकरे गट : चिन्ह धगधगती मशाल; प्रादेशिक पक्ष म्हणून मिळाली मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात निवडणूक आयाेगाने गटांचे नाव व चिन्हांबाबत निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे राहील. ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले. तर शिंदे गटाला चिन्हाचे नवे तीन पर्याय मागितले आहेत.
येत्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हंगामी आदेश देताना निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांनी मागितलेल्या नावावर आयाेगाने आदेश जारी केले आहेत.
शिंदे गटाचे तिन्ही निवडणूक चिन्ह मात्र आयोगाने नाकारले असून, उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत तीन नव्या निवडणूक चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी लागणार आहे. मंगळवारी हे पर्याय देणार असल्याचे शिंदे गटाने म्हटले असून त्यानंतर आयोग याच दिवशी निर्णय देण्याची शक्यता आहे.
‘धगधगती मशाल’वर असा झाला निर्णय
ठाकरे गटाची पहिली पसंती त्रिशूल होते, तर दुसरे उगवता सूर्य होते. याच चिन्हांवर शिंदे गटानेही दावा केला होता. यामुळे हे दोन्ही चिन्ह त्यांना मिळाले नाही. तिसरे चिन्ह धगधगती मशाल होते.
हे चिन्हसुद्धा यापूर्वी दुसऱ्या समता पक्षाला दिले होते. परंतु या पक्षाचे अस्तित्व नसल्यामुळे आता ते मुक्त चिन्हांमध्ये आल्याने ते ठाकरे गटाला दिले आहे. परंतु हे चिन्ह केवळ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरते आहे. आयोगासमोर सुरू असलेल्या निवाड्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे.
धार्मिक कारणांनी चिन्ह नाकारले
ठाकरे गटाने त्रिशूल व शिंदे गटाने त्रिशूल व गदा या चिन्हांवर दावा केला होता. परंतु या चिन्हांना धार्मिक संदर्भ असल्याने हे चिन्ह प्रदान केले नाही, असे आयाेगाने स्पष्ट केले. उगवता सूर्य हे चिन्ह तामिळनाडूतील डीएमकेचे असल्याने ते चिन्ह नाकारण्यात आले. यामुळे शिंदे गटाची तिन्ही चिन्हे आयोगाने नाकारली.
दाेन्ही गटांचा दुसरा पसंतीक्रम मान्य
दोन्ही गटांना पहिल्या प्राधान्याचे नाव पक्षाला मिळाले नाही. शिंदे गटाने पहिले प्राधान्य शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाला दिले होते, तर दुसरा प्राधान्यक्रम बाळासाहेबांची शिवसेना असा दिला हाेता. निवडणूक आयोगाने दुसरा पसंतीक्रम मान्य केला. उद्धव ठाकरे गटाने पहिले प्राधान्य शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असे दिले होते. दोन्ही गटांनी एकाच नावावर दावा केल्याने निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला व दुसऱ्या प्राधान्य क्रमावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव होते.
आयोगाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान
गेल्या शनिवारी आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह गोठविण्याप्रकरणी दिलेला निर्णय ‘एकतर्फी’ व ‘नैसर्गिक न्याया’ला धरून नसल्याचा दावा करून या आदेशाला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी आव्हान दिले. ही याचिका ठाकरे गटाचे वकील सनी सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. सुनावणीसंदर्भात मंगळवारी सकाळी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गटानेही उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.