ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देणार
By admin | Published: April 5, 2017 12:59 AM2017-04-05T00:59:24+5:302017-04-05T00:59:24+5:30
महापालिका निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) त्रुटीबाबत जनआंदोलन सुरू झाले
पुणे : राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) त्रुटीबाबत जनआंदोलन सुरू झाले आहे. ईव्हीएम मशीनविरोधी कृती समितीच्या वतीने त्याविरोधात आता कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यासाठी मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असून, त्याविरोधात दाद मागण्यासाठी लवकरच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येईल, असे समितीचे मार्गदर्शक तेहसीन पूनावाला यांनी येथे सांगितले.
उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर ईव्हीएम मशीनबाबत देशपातळीवर आवाज उठवला जात असून, अनेक राष्ट्रीय नेतेदेखील त्यामध्ये उतरले आहेत. याबाबत सर्वांत प्रथम पुण्यात ईव्हीएम मशीनविरोधी कृती समितीच्या वतीने आवाज उठवून आंदोलन सुरू केले गेले.
यामध्ये पुण्यातील निवडणुकीत पराभूत व ईव्हीएम मशीनमुळे फटका बसलेले दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, रूपाली ठोंबरे-पाटील, विकास दांगट, मिलिंद काची, दत्ता गायकवाड यांच्यासह इतर अनेक उमेदवारांनी एकत्र येऊन ही समिती स्थापन केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसंबंधातील कागदपत्रे मिळावीत, यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त जे़ एस़ सहारिया यांची मुंबईत कृती समिती भेट घेणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले़ (वार्ताहर)
>गुन्हे दाखल करा
भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासोहब आंबेडकर, तेहसीन पूनावाला, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा, चुकीचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत व बहुसदस्य प्रभाग पद्धत रद्द करावी, अशी मागणी समितीने केली आहे.