नागपुरातील धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे, स्थानिकांचं देवाकडे साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 10:33 PM2017-08-12T22:33:25+5:302017-08-12T22:34:30+5:30
पावसानं दडी दिल्यानं नागपुरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे ‘देवा धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे’असे साकडे ते घालत आहेत.
गणेश खवसे/नागपूर, दि. 12 - असमाधानकारक पावसामुळे नागपूर जिल्ह्याचा धानपट्टा म्हणून ओळख असलेल्या मौदा तालुक्यातील ७५ टक्के धान रोवणी खोळंबली आहे. तीन दिवसांपूर्वी थोडा पाऊस झाला. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. परिणामी धान रोवणी थांबली असून धान उत्पादक चिंताग्रस्त आहेत. यासाठी मौदा तालुक्यात कुठे महाप्रसाद, कुठे जलपूजन, तर कुठे दिंडी काढण्यात येत आहे.
‘देवा धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे’अशा प्रकारे साकडे ग्रामस्थ घालत आहेत. येत्या दोन-चार दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर रोवणी केलेले २५ टक्के धान पीकही हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मौदा तालुक्यात यावर्षी तालुका कृषी विभागाने ३७ हजार हेक्टर धान पिकाचे क्षेत्र निर्धारित केले होते. त्यापैकी ९,६१७ हेक्टरमध्ये ७ ऑगस्टपर्यंत धान रोवणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धर्मे यांनी दिली. निर्धारित क्षेत्रापैकी केवळ २५ टक्के क्षेत्रात धान रोवणी झाली असून, ७५ टक्के रोवणी पुरेशा पावसाअभावी खोळंबलेली आहे. त्यामुळे समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी गावोगावी पावसासाठी साकडे घालत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
धानोली येथे परमात्मा एक सेवक मंडळाच्यावतीने ग्रामस्थांनी गावभोजना (महाप्रसाद)चे आयोजन केले होते. दुधाळा येथे वरुण देवता प्रसन्न होण्यासाठी हरिनामाच्या गजरात जलपूजन करण्यात आले. भरपूर पाऊस पडावा यासाठी खात येथे चिमुकल्यांनी भजन सादर केले. वैष्णव वारकरी सांप्रदायिक भजन मंडळातर्फे हरिपाठ आणि भजन आयोजित करण्यात आले होते. कोदामेंढी येथील बाजार चौकस्थित हनुमान मंदिरासह तांडा, देवमुंढरी, घोटमुंढरी येथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. चिरव्हा येथे रविवारी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चाचेर येथेही प्रार्थना करण्यात आली. महिलांनी मंदिरात घागरीने पाणी आणून जलाभिषेक केला. यासोबतच दिंडी मिरवणूक काढण्यात येत आहे. मौदा तालुक्याचे मुख्य पीक हे धान असून, धान रोवणीच खोळंबली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या हंगामात अद्यापही तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. पाण्याची पातळीसुद्धा खालावली आहे. त्यामुळे मौदा तालुका दुष्काळाच्या छायेत आहे.