निवृत्त जवानांना गेटकिपर म्हणून प्राधान्य देणार
By Admin | Published: May 6, 2014 11:44 PM2014-05-06T23:44:48+5:302014-05-07T00:51:37+5:30
निवृत्त जवानांचा गेटकिपर म्हणून प्राधान्य देण्याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे़
पुणे : रेल्वेगाडी येत असतानाही गेटकिपरवर दबाव टाकून प्रसंगी त्याला शिवीगाळ करुन गेट उडण्यास लावण्याचे प्रकार वाढले असून,अशा घटना अपघातास कारणीभूत ठरु शकतात़ त्यामुळे यापुढे निवृत्त जवानांचा गेटकिपर म्हणून प्राधान्य देण्याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे़
मालगाडी गेल्यानंतर दुरोंतो एक्सप्रेस येत असतानाही वाहनचालकांनी आरडाओरडा केल्याने खामगाव येथील रेल्वे गेटकिपरने फाटक उघडल्याने एक्स्प्रेसची टॅक्टरला धडक बसून त्यात तिघांचा मृत्यु झाला होता़ याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गेटकिपर यादव याला अटक केली असून त्याच्याकडे तपास करण्यात येत आहे़ यादव याने आपल्या जबाबात सांगितले, की मालगाडी गेल्यानंतर आपण रेल्वे स्टेशनला विचारणा केली पण फोन उचलला गेला नाही़ तसेच लोकांकडून फाटक उघडण्यासाठी आरडाओरडा सुरु झाल्याने आपण फाटक उघडले़ त्यामुळे ही दुर्घटना घडली़
मध्य रेल्वेने मानवरहित असलेली १५ फाटके गेल्या वर्षभरात बंद केली आहेत़ फाटक बंद असताना अनेकदा वाहनचालकांकडून गेटकिपरवर दबाव टाकून ते उघडण्यास भाग पाडले जाते़ अनेक वाहनचालक एकत्र येऊन या गेटकिपरशी वाद घालतात, तेव्हा त्यांना समजावून सांगणे सर्वच गेटकिपरला शक्य होतेच असे नाही़ त्यातून अशा दबावाला बळी पडून फाटक उघडले गेल्याने दुर्घटना घडू शकतात़
गेटकिपर म्हणून कर्मचार्यांची नेमणूक करताना त्यांना त्याचे महत्व समजावून सांगितले जाते़ तसेच वर्षातून दोन ते तीन वेळा परिसंवाद, बैठका घेऊन बदलेल्या नियमांची माहिती त्यांना दिली जाते़ त्यांनी करावयाची कामाविषयी सर्व प्रकारचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते़ तरीही जर समुहाने लोक त्यांच्याकडे आले व दबाव टाकू लागले तर त्यांना समजावून सांगण्याइतकी पात्रता संबंधित गेटकिपरकडे असेलच असे नाही़ रेल्वेने आज सकाळी अचानक दापोडी येथे तपासणी केली त्यावेळी तेथील गेटकिपरने रात्रीच्या वेळी अनेकदा मद्यप्राशन केलेले तरुण गटाने येऊन शिवीगाळ करीत फाटक उघडण्यास सांगतात़ अशावेळी आम्हाला कोणाकडूनही सरंक्षण नसते अशी तक्रार करीत होते़ त्यामुळे अशा ठिकाणी निवृत्त जवानांची नेमणूक केली तर त्यांच्यावर फाटक उघडण्यासाठी अवाजवी दबाव टाकला जाणार नाही, असे जनसंपर्क अधिकारी वाय़ के़ सिंह यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)