कृषी शिक्षणात होणारे नवे बदल स्वीकारावे- कुलगुरु संजय देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 02:41 AM2017-02-06T02:41:31+5:302017-02-06T02:41:31+5:30
डॉ.पंदेकृविचा ३१ वा दीक्षांत समारंभ ; २,५९३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान.
अकोला, दि. ५- जागतिक पातळीवर शेती तंत्रज्ञान, कृषी अभ्यासक्रमात आमूलाग्र नवे बदल होत असून, आधुनिक तंत्रज्ञान वापरू न शाश्वत शेती केली जात आहे. जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपणासही हे नवे बदल स्वीकारावे लागणार असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी रविवारी येथे केले.
यावेळी निरनिराळय़ा कृषी अभ्यासक्रमाच्या २,५९३ विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते पदवी प्रदान करण्यात आली. नागपूर कृषी महाविद्यालयाची एमएससीची प्राविण्यप्राप्त विद्यार्थींनी आगा तब्सुम मकबुल हिला ६ सुवर्ण, विकास रामटेके यांना ३ सुवर्ण त्यांच्या अनुपस्थित तर सुवर्णा गरे हिला दोन सुवर्ण पदक प्रदान करण्यात आली. तसेच गडचिरोली सारख्या आदीवासी भागातील आदित्य घोगरे हा तीन सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी दीक्षांत भाषणात डॉ. देशमुख बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर होते. दीक्षांत पीठावर डॉ.पंदेकृवि कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा आमदार रणधिर सावरकर, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, महाराष्ट्र पशुधन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आदित्यकुमार मिश्रा, मणिपूरच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पुरी यांच्यासह या कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बळवंत बथकल, डॉ.शरद निंबाळकर, डॉ. व्ही.एम. मायंदे, डॉ.जी.एम.भराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. देशमुख यांनी पावसाच्या पाण्याची प्रचंड कमतरता असताना इस्त्रायलने कृषी क्षेत्रात प्रचंड क्रांती केली असल्याचे सांगितले. शाश्वत एकात्मिक कृषी विकास कंपन्याचे संशोधक व उद्योजक बोझ वॉज्येल आणि श्ॉरोन डेव्हीर यांनी हवेतील ओलाव्याचे शेतमाल उत्पादनासाठीचे तंत्रज्ञान उपयोगात आणले असून, या तंत्रज्ञानाचा वापर करू न त्यांनी किफायतशीर शेती केली आहे. पाण्याची वाफ गोळा करू न १00 टक्के स्वच्छ पाणी पिकांना देण्याची सोय करण्यात आली आहे. याकरिता सौर उज्रेचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाचा वापर करू न ४0 टक्केपक्षा जास्त आर्द्रता मिळाली. दिवस व रात्रीच्या तापमानात होणार्या बदलावर त्यांनी उपाय शोधले असून, हरित गृहाचा वापर व विविध तंत्रज्ञान वापरू न पीक उत्पादनात क्रांती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भ-मराठवाड्यात पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी असून, कृषी प्रक्रिया उद्योगातही हा मागे आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांची परिस्थिती वेगळी नाही. कापसाबाबतही असेच चित्र आहे. कापूस विदर्भात आणि सूतगिरण्या दुसरीकडे आहेत. दरम्यान, कृषी क्षेत्रावर सरकारने लक्ष केंद्रित केले असून, शेतकर्यांना ओलिताच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता ७ लाख ८५ हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून, खासगी व आंतराष्ट्रीय गुंतवणूक या क्षेत्रात वाढली आहे. देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना कृषिप्रधान संस्कृती व सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्राची असली, तरी सर्वाधिक टक्का असणार्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने कृषी पदवीधरांवर अधिक उमेद असल्याचे ते म्हणाले. डॉ. पुरी यांनी भविष्यात वाढणारी लोकसंख्या तसेच त्याकरिता लागणारे अन्नधान्य हा मोठा प्रश्न असून, याकरिता सरकारने गांभीर्याने पावले उचलली असल्याचे सांगितले; पण त्यासाठी काम करणारे तज्ज्ञ हवे आहेत. आजमितीस कृषी विद्यापीठामध्ये ४0 टक्के तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव आहे. गुणवत्ताधारक पदवीधर निर्माण करणार कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कृषी शास्त्रज्ञांवरही मोठी जबाबदारी असून, नवे निर्माण करताना ५0 लीटरऐवजी ३0 लीटर पाण्यात म्हणजे कमी खर्च आणि कमी पाण्यात येणार्या वाणाची निर्मिती करणे काळाची गरज आहे. शासनाच्या कृषी विभागाने हे संशोधित तंत्रज्ञान, वाणाचा प्रसार करणे क्रमप्राप्त असल्याचे ते म्हणाले.
डॉ. पंदेकृविचे मावळते कुलगुरू डॉ. दाणी यांनी कृषी विद्यापीठाच्या विकासाचे अहवाल वाचन केले. त्यांनी खारपाणपट्टा विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प शासनाने दिला असून, त्याचे काम कृषी विद्यापीठाकडे दिले असल्याचे सांगितले. दीक्षांत समारंभाला खासदार संजय धोत्रे, अमेरिकेच्या जेनी हंटर, कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर आदीसह अनेकांची उपस्थिती होती.