"इंदू सरकार" आधी आम्हाला दाखवा, काँग्रेसचं सेन्सॉर बोर्डाला पत्र
By admin | Published: July 5, 2017 12:26 PM2017-07-05T12:26:01+5:302017-07-05T12:43:51+5:30
आणीबाणीवर आधारित या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ सिनेमाचा नुसता ट्रेलर रिलीज झाला, आणि वाद, चर्चेला सुरुवात झाली आहे. आणीबाणीवर आधारित या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या असल्याने काँग्रेसने आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे.
आणखी वाचा -
संजय निरुपम यांनी पत्रात लिहिलं आहे की, "भरत शाह दिग्दर्शित आणि मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार चित्रपटाबद्दल बोलायचं आहे. ट्रेलरनुसार चित्रपट आणीबाणीवर आधारित असल्याचं दिसत आहे. तसंच चित्रपटात आमचे लाडके नेते इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्यासह काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि उल्लेख असल्याचं पाहायला मिळालं".
"चित्रपटातून आमच्या नेत्यांची प्रतिमा मलीन तसंच बदनामी केली नसल्याची खात्री आम्हाला करायची असून सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळण्याआधी आम्हाला चित्रपट पाहायचा आहे. तुम्ही आमची समस्या समजून घेऊ शकता आणि मदत कराल अशी अपेक्षा आहे". अशी मागणीही संजय निरुपम यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर -
दरम्यान चित्रपटावर आक्षेप घेणारे संजय निरुपम एकटेच व्यक्ती नसून याआधी प्रिया सिंग पॉल यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. "या चित्रपटात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या सिनेमावर बंदी आणावी", अशी मागणी प्रिया सिंग पॉल यांनी केली आहे. यानंतर ‘इंदू सरकार’ सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.
प्रिया सिंग पॉल यांनी विरोध केल्याने एक वेगळाच मुद्दा आता चर्चेला आला आहे. कारण प्रिया सिंग पॉल कोण आहेत याची माहिती घेत असताना त्यांनी आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. प्रिया सिंग पॉल यांनी नोटीस पाठवताना आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा उल्लेखच केला आहे.
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. 28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल.