उत्तम आरोग्याची गुढी उभारूया ! - दा. कृ. सोमण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:11 PM2020-03-24T17:11:31+5:302020-03-24T17:12:25+5:30
यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने गुढीपाडवा हा सण अधिक जबाबदारीचा झाला आहे.
ठाणे : बुधवार दि. २५ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. शालिवाहन शक १९४२ शार्वरीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. दरवर्षी गुढीपाडवा सण येतो, परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने गुढीपाडवा हा सण अधिक जबाबदारीचा झाला आहे.
यावर्षी आपण स्वच्छतेची, शिस्तीची आणि उत्तम आरोग्याची गुढी उभारूया असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक बोलताना श्री. सोमण म्हणाले की, शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला म्हणून आपण हा सण साजरा करीत असतो. आपणास कोरोनाचा पराभव करायचा आहे. यासाठी सामाजिक शिस्त सर्वानी पाळणे जरूरीचे आहे. प्रभू रामचंद्रानी रावणाचा वध करून ते या दिवशी अयोध्येत परतले. आपणास बेशिस्त,अस्वच्छता, अज्ञान , आळस यांचा वध करावयाचा आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. या दिवशी सुवर्ण खरेदी करतात. आपण यावर्षी आरोग्याचे सुवर्ण खरेदी करूया. स्वच्छता, शिस्त ठेवुया.
दरवर्षी बाजारातून गुढीपाडव्यासाठी अनेक गोष्टी खरेदी करीत असतो. यावर्षी संयमाने वागूया. घरातून बाहेर न पडता घरातीलच उपलब्ध वस्तू वापरून गुढीपाडवा सण साजरा करूया. पूजा मिळालेल्या साधनानी करूया. परमेश्वर सर्व जाणतो. वर्षाचा चैत्र शुक्ल प्रतिपदेचा , वर्षारंभाचा हा दिवस उत्तम आरोग्यासाठी लागणार्या गोष्टींचा संकल्प करून साजरा करूया असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.