'दसर्‍याच धुणं' काढू या लोकशाही स्वच्छ करू या !

By admin | Published: September 23, 2014 02:12 PM2014-09-23T14:12:54+5:302014-09-23T14:12:58+5:30

घटस्थापना तोंडावर. 'दसर्‍याचं धुणं' काढून गृहिणी घरातल्या स्वच्छतेत गुंतलेली. बाहेर दिवाणखान्यात पती पेपर वाचता-वाचता तिला राजकारणातल्या गमती-जमती सांगू लागलेला.

Let's cleanse the democracy by releasing 'Dhasya Dhawan'! | 'दसर्‍याच धुणं' काढू या लोकशाही स्वच्छ करू या !

'दसर्‍याच धुणं' काढू या लोकशाही स्वच्छ करू या !

Next

- होऊ दे चर्चा..

(घटस्थापना तोंडावर. 'दसर्‍याचं धुणं' काढून गृहिणी घरातल्या स्वच्छतेत गुंतलेली. बाहेर दिवाणखान्यात पती पेपर वाचता-वाचता तिला राजकारणातल्या गमती-जमती सांगू लागलेला. राजकारणाशी देणं-घेणं नसल्यानं, ती मात्र स्वत:च्याच प्रॉब्लेममध्ये गर्क.)

पती : अगं; आजची सर्व्हे न्यूज वाचलीस? गेल्या वीस वर्षांतील निवडणुकांमध्ये म्हणे पैसाच महत्त्वाचा ठरलाय!
पत्नी :(स्वत:शीच पुटपुटत) कित्तीऽऽ खर्च करावा बाई किचनमधल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुरुस्तीवर. पैशाला काही मोजमापच राहिलेलं नाही.
पती :(पुढची बातमी वाचत) पूर्वी 'उमेदवारांचं चारित्र्य' हाच मुद्दा प्रचारात महत्त्वाचा असायचा.
पत्नी :(भूतकाळात रमत) सासूबाईंच्या काळात खलबत्ता अन् उखळ होतं, तेव्हा चटणी किती स्वच्छ अन् चवीची व्हायची.
पती : दोन दशकांपूर्वी उमेदवाराच्या कर्तबगारीचा सारासार विचार करूनच सारेजण मिळून मतदानाचा निर्णय घ्यायचे. आता मात्र, निवडणुकीत प्रत्येक जण केवळ स्वत:चंच हित बघतोय.
पत्नी : (स्वत:च्याच तंद्रीत) साधा पितळेचा तांब्या विकत आणायचा असला तरी सासूबाई घरात सर्वांशी चर्चा करत. आता मात्र, माझी सून तिला आवडलेली स्टीलची टाकी परस्पर विकत घेऊन आलेली.
पती :भपकेबाज प्रचाराला जनता भुलतेय. भाडोत्री कार्यकर्ते घेऊन फिरणारा छाडमाड उमेदवारही आजकाल ताकदीचा समजला जाऊ लागलाय.
पत्नी : (चिडून) दोन महिन्यांत ती टाकी गळू लागली, तरीही सून म्हणते, 'स्टील किती चकाचक!'
पती :भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेतेही उजळमाथ्यानंच लोकांसमोर फिरताहेत.
पत्नी :(कपड्यांचा ढीग उपसत) यांचा शर्ट किऽऽत्ती घाण झालाय बाई; तरीही अस्साच घालून जातात बाहेर.
पती :डागाळलेल्या नेत्यांना 'ना जनाची ना मनाची'.
पत्नी :कपड्यांवरच्या डागांकडंही लक्ष नाही यांचं.
पती : गुंडगिरीतील पैशावर गबरगंड झालेले कार्यकर्ते लढविताहेत निवडणुका.
पत्नी :खिशातल्या तंबाखूच्या पुडीमुळं पँट पाऽऽर खराब झाली, तरी अशाच कपड्यांवर यांचं मिरवणं सुरूच.
पती :मात्र, भ्रष्टाचारी गुंड नेत्यांना विरोध करण्याची हिम्मत कुणाचीच नाही बघ. तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
पत्नी :(मनाशी ठाम ठरवत) आता मात्र सारे कपडे धुवून काढायलाच हवेत. घासून-घासून डाग काढलेच पाहिजेत. गळकी टाकी कोनाड्यात टाकून द्यायला हवी. माझ्या घराची स्वच्छता आता मीच करायला हवी.
(टीप : घर साफ करण्यासाठी माता-भगिनी कामाला लागल्यात; मग लोकशाही स्वच्छ करण्यासाठी बाकीचे मागं का? म्हणूनच चला; कामाला लागू या.. आपली लोकशाही आपणच स्वच्छ धुवून काढू या.)
- सचिन जवळकोटे
 

Web Title: Let's cleanse the democracy by releasing 'Dhasya Dhawan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.