आता रडून नव्हे, लढून संघर्ष करू या!
By admin | Published: April 23, 2016 04:01 AM2016-04-23T04:01:39+5:302016-04-23T04:01:39+5:30
आत्मविश्वास गमावून खचून जाऊ नका. तुम्हाला रडून नव्हे, तर लढून संघर्ष करायचा आहे. तुमच्या पाठीशी यशस्विनी सामाजिक अभियान खंबीरपणे उभे आहे
अंबाजोगाई : आत्मविश्वास गमावून खचून जाऊ नका. तुम्हाला रडून नव्हे, तर लढून संघर्ष करायचा आहे. तुमच्या पाठीशी यशस्विनी सामाजिक अभियान खंबीरपणे उभे आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री व मदत तत्काळ केली जाईल, अशा शब्दांत खा. सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक विधवा महिलेचे मनौधेर्य वाढविले.
येथील मानवलोकच्या सभागृहात यशस्विनी सामाजिक अभियानच्या वतीने गुरुवारी रात्री मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचा मेळावा घेण्यात आला. गरजू महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी, शेळ्या, म्हशी यांचे वाटप करण्यात आले; शिवाय ज्या विधवा महिलांची मुले पुणे व इतर शहरांत शिक्षणासाठी तयार असतील तर त्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिले. खासगी सावकाराकडून कर्ज फेडणे शक्य होत नाही म्हणून आमच्या घरधन्याने स्वत:ला संपविले. सावकाराच्या कर्जानेच आमचे कुंकू पुसले, अशा व्यथा अनेक महिलांनी मांडल्या. शासनाने दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी राहावे : उस्मानाबाद : मराठवाड्यातील नागरिक तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. हंडाभर पाण्यासाठी रात्री-बेरात्री जागणाऱ्या महिला, अबाल-वृद्धांचा दुष्काळाशी लढा सुरू आहे. शासनाने दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.शासन असंवेदनशील : लातूर : मराठवाड्यात विशेषत: लातूरमध्ये भयावह स्थिती आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. यावर केंद्र व राज्य शासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. दुष्काळाबाबत राज्य आणि केंद्र सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.