शेवटपर्यंत लढूया; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलं बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 09:19 PM2022-06-22T21:19:19+5:302022-06-22T21:19:58+5:30
राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
“शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील येऊन गेले. मुख्यमंत्री मातोश्रीवर राहणार आहे. मोह माया सत्ता याचा आम्हाला लोभ नाही. आम्ही लढत राहू. शेवटी सत्याचा विजय होईल अशी भूमिका आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी येऊन महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी ज्या सद्भावना व्यक्त केल्या त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.
#WATCH Uddhav Thackeray will remain the Chief Minister of Maharashtra, says Shiv Sena leader Sanjay Raut in Mumbai.#Maharashtrapic.twitter.com/WgcIIacVgx
— ANI (@ANI) June 22, 2022
“मातोश्रीवर ते का जात आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील. संधी मिळाली तर आम्ही बहुमत सिद्धही करून दाखवू. ही लढाई आपण शेवटपर्यंत लढायची अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. कोणताही सल्ला दिला गेला नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.