...तर भाजपाचे समर्थन काढून घेऊ!
By admin | Published: April 20, 2016 05:43 AM2016-04-20T05:43:50+5:302016-04-20T05:43:50+5:30
कसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले होते, ते पूर्ण होत नसल्याने राज्यातील १५०हून अधिक मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले होते, ते पूर्ण होत नसल्याने राज्यातील १५०हून अधिक मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र मुस्लीम संघाने नाराजी व्यक्त केली आहे. तीन महिन्यांत सरकारने अजेंड्यावरील मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर सरकारला दिलेले समर्थन काढून घेऊ, असा इशारा संघाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांत एकदाही भेटीसाठी वेळ दिला नसल्याची नाराजी संघाचे मुख्य संयोजक फकीर मोहम्मद ठाकूर यांनी व्यक्त केली. ठाकूर म्हणाले, ‘निवडणुकांआधी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या मध्यस्थीनंतर मुस्लीम समाजासाठी काम करणाऱ्या १५०हून अधिक संस्था आणि संघटनांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी मुस्लीम समाजाच्या अनेक प्रश्नांसह मेहमुदूर रेहमान समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र, त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप सरकारने केलेली नाही. संघाचे ३२ जिल्ह्यांतील प्रतिनिधींची मंगळवारी बैठक झाली. त्यात प्रत्येक सदस्याने मनातील खदखद व्यक्त केली. अल्पसंख्यांक समाजासाठी सरकारने सुरू केलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारावर सर्व सदस्यांनी ताशेरे ओढले. उच्चशिक्षण घेणाऱ्या शेकडो मुस्लीम तरुण विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने, परीक्षेला मुकावे लागत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
दुष्काळग्रस्तांसाठी पुढाकार
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळग्रस्त गावांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र मुस्लीम संघ निधी गोळा करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यासाठी मुस्लीम समाजातील उद्योजक आणि व्यावसायिकांना आवाहन केले जाईल. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी संघ एक गाव दत्तक घेणार असून, सध्या तात्पुरत्या स्वरूपात अधिकाधिक दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)