चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवे डोळा पाहू!
By Admin | Published: November 15, 2016 05:35 AM2016-11-15T05:35:55+5:302016-11-15T05:35:55+5:30
आळंदी येथे होणाऱ्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठलाच्या पालखीने सोमवारी पंढरीतून टाळ-मृदंगाच्या
पंढरपूर : आळंदी येथे होणाऱ्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठलाच्या पालखीने सोमवारी पंढरीतून टाळ-मृदंगाच्या जयघोषात प्रस्थान ठेवले. संत शिरोमणी नामदेवांची पालखीदेखील माऊलींना भेटण्यासाठी अलंकापुरीकडे निघाली आहे.
मागील तीन वर्षापासून श्री विठ्ठलाच्या पादूका आळंदीला नेऊन तेथील ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात देवाला सहभागी करण्याची परंपरा रूढ झाली आहे. त्यानिमित्ताने सोमवारी पंढरीत दुपारी श्री विठ्ठल मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात ‘पादुका’ ठेवून प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, सोहळाधिपती माजी न्यायमूर्ती विठ्ठल महाराज वासकर व त्यांच्या सुविद्य पत्नी रेणुकाताई वासकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर पादुका देवाच्या पायाजवळ ठेवून नंतर टाळ मृदंगाच्या जयघोषात रावळामध्ये ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात आल्या.
श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. या पालखी सोहळ्यामध्ये एकूण १८ दिंड्या सहभागी झाल्या असून पालखीपुढे १४ दिंड्या व पालखीमागे चार दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सुमारे १७ हजार वारकरी या सोहळ्यात दाखल झाले आहेत. महिलाही यावर्षी पहिल्यांदाच सहभागी झाल्या आहेत. सोहळा २६ नोव्हेंबर रोजी आळंदीत पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)