चला जीवाचं नागपूर करायला...! सावजींनी वेगवेगळे मसाले तयार...
By अतुल कुलकर्णी | Published: December 18, 2022 10:45 AM2022-12-18T10:45:42+5:302022-12-18T10:46:59+5:30
या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्या नेत्यांना एक ठराव मंजूर करून टाका, असं सांगितलं पाहिजे. ज्या-ज्या शब्दांमुळे प्रतिष्ठा येत नाही, ते सगळे शब्द रद्द करून, त्या जागी कोणते वजनदार मराठी शब्द वापरायचे, तेही सांगून टाकलं पाहिजे.
- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांनो,
सप्रेम नमस्कार.
नागपूरच्या संत्रा नगरीत आपलं मनःपूर्वक स्वागत. हिवाळी अधिवेशनासाठी म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा या शहरात येत आहेत. त्यांचं जल्लोषात झालेलं स्वागत आपण पाहिलंच असेल. नागपूरमधला एकही कोपरा नेत्यांच्या बॅनरशिवाय उरलेला नाही. नागपूरचे लोक मनानं अत्यंत नितळ आहेत. एखादी गोष्ट पटली, तर कौतुक करायला वाट बघणार नाहीत... खटकली तर जाहीरपणे ‘तर्री पोहे’ खात सांगायलाही कमी करणार नाहीत.
या अधिवेशनाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलंय... असं बोलण्याची पद्धत आहे. खरं सांगायचं तर कोणाचंही, काहीही लक्ष लागलेलं नाही. तेव्हा टेन्शन घेऊ नका. थंडीच्या दिवसांत दोन आठवडे आलाच आहात, तर आराम करा. सगळ्यात खूश हॉटेलवाले आहेत. त्यांच्या सगळ्या रूम बुक झाल्या आहेत. ज्या रूमचं भाडं १० हजार होतं, त्या रूम आता ४० हजारांवर गेल्या आहेत. संपूर्ण आमदार निवास चकाचक झालंय. मात्र, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची सोय केल्याची माहिती आहे. नागपुरात एवढी हॉटेलं बांधून ठेवली आहेत, त्याचा वापर नेत्यांनी करायचा नाही, तर कोणी करायचा...? तुम्ही स्वतःला नेत्यांच्या कॅटेगिरीत ठेवत असाल, तर आपणही कुठल्या ना कुठल्या चांगल्या हॉटेलमध्ये राहा...! त्या निमित्ताने भेटीगाठी होतात. रात्री ‘ग्रंथवाचन’ होतं. त्यातून वैचारिक आदान प्रदान होतं. आमदार निवासात राहून ‘ग्रंथवाचन’ करायचं ठरवलं, तर कार्यकर्ते डिस्टर्ब करतात, असा अनुभव आहे. तेव्हा हॉटेलातल्या बंदिस्त खोलीत ‘बसलेलं’ बरं. नेत्यांच्या सेक्रेटरींनी आतापर्यंत कशा आणि किती रूम पाहिजेत, असा फतवा नागपुरात पाठविला असेलच. (‘फतवा’ शब्द आवडत नसेल, तर ‘आदेश’ शब्द योग्य होईल ना..!) सगळे ठेकेदार, गुत्तेदार, मध्यस्थ कामाला लागले की नाहीत, हे तपासून घ्या. त्यांना मुंबईत आपल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, याची जाणीव करून द्या. खरं तर कॉन्ट्रॅक्टर, लायझनिंग ऑफिसर असे अस्सल मराठी शब्द वापरले की वजनदार वाटतात...! मात्र, ठेकेदार, गुत्तेदार असले इंग्रजी शब्द आपल्याकडे उगाचच का वापरतात, कोणास ठाऊक...?
मला काय वाटतं, या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्या नेत्यांना एक ठराव मंजूर करून टाका, असं सांगितलं पाहिजे. ज्या-ज्या शब्दांमुळे प्रतिष्ठा येत नाही, ते सगळे शब्द रद्द करून, त्या जागी कोणते वजनदार मराठी शब्द वापरायचे, तेही सांगून टाकलं पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं, तर ‘बाबूरावांनी दोन खोल्यांसाठी गुत्तेदाराला सांगितलं. काम व्हायच्या आधी मोजून सगळा माल हातात पाहिजे, असा निरोप दिला...’ हे वाक्य वाचायला, ऐकायला बरं वाटत नाही. त्याऐवजी, ‘बाबूरावांनी लायझनिंग ऑफिसरला फाइव्ह स्टार, सीस्टिमॅटिक फिल्डिंगसाठी इन्फॉर्म केलं...’ हे वाक्य शुद्ध मराठीत आहे, आणि किती दमदार आहे...! हल्ली सगळं खोलून सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही, म्हणून हे उदाहरण दिलं...!
अधिवेशन नागपुरात होणार, म्हणून सगळ्या सावजींनी वेगवेगळे मसाले करून ठेवले आहेत. नागपूर शहरात आणि शहराबाहेर अनेक चतुष्पाद काही द्विपाद आणून ठेवले आहेत. तुमच्या पसंतीचा निवडून त्याचा आस्वाद घ्या. थंडीचे दिवस आहेत. सोबत रंगीत पाणीही ठेवा. म्हणजे थंडी वाजणार नाही. तुमच्या आवडीनुसार डार्क, लाइट, तसेच वेगवेगळ्या वासाचंही रंगीत पाणी मिळतं. आपण तयारीनं या... किंवा नागपुरातल्या तुमच्या मित्रपरिवाराला आधीच सांगून ठेवा...! एकाच मित्रावर विसंबून राहू नका. कारण काही लोक एकावरच सगळा भार टाकतात. अशा वेळी ज्या मित्रावर नको तेवढा भार पडतो, तो फोन बंद करून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना या आधी घडल्या आहेत. सावधगिरी म्हणून सांगून ठेवतो.
कोणी मुंबईला निघालं की जीवाची मुंबई करून या, असं सांगितलं जातं. मात्र, जीवाचं नागपूर करून या, असं कोणी सांगत नाही. नागपूरकर पाहुणचाराला पक्के आहेत. सगळी चोख व्यवस्था करतील. दीड-दोन आठवड्यांच्या पाहुणचारात ते कसलीही कसर सोडणार नाहीत. तुम्ही सगळे येतच आहात, तर विदर्भासाठी काही विकासाच्या योजना, काही घोषणा, इथे प्रलंबित असणाऱ्या हजारो प्रश्नांना न्याय देण्यासाठी काही करता आलं, तर तुमच्या नेत्यांना आठवणीने सांगा. एवढी अपेक्षा चुकीची नसावी...! त्याशिवाय तुमच्या ओळखीच्या मंत्र्यांना सांगून सगळ्या मंत्र्यांची एखादी बैठक मराठवाड्यात घेता येते का, तेही विचारा. अनेक वर्षं अशी बैठक झालेली नाही. तेवढंच सगळ्यांना जीवाचा मराठवाडा करता येईल...! पटलं तर द्या टाळी, नाहीतर पेटवा शेकोटी... थंडीत मदत होईल...
- आपलाच बाबूराव