आधुनिक, प्रगत व सक्षम महाराष्ट्र घडवू या!
By admin | Published: May 2, 2017 05:17 AM2017-05-02T05:17:08+5:302017-05-02T05:17:08+5:30
राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच आधुनिक, प्रगत व सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मला
मुंबई : राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच आधुनिक, प्रगत व सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मला नागरिकांकडूनही मन:पूर्वक सहकार्याची अपेक्षा आहे. सर्वांच्या एकत्रित सहभागातून आपले राज्य विकसित आणि समृद्ध बनवू या, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी महाराष्ट्र दिनानिमित्त येथील शिवाजी पार्क येथे आयोजित राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभप्रसंगी केले.
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लेखाजोखा या वेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी मांडला. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अडीच लाखांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. शाश्वत शेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ‘स्वच्छ भारत’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा एक भाग म्हणून राज्यातील २२५ शहरे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर, २ आॅक्टोबर २०१७पर्यंत महाराष्ट्राच्या नागरी भागाला हागणदारीमुक्त करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा हमी कायद्याअंतर्गत जवळपास ३७२ सेवा पुरविण्यात आल्या आहेत. राज्याच्या ५१ शहरांमध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची सरकार अंमलबजावणी करणार आहे. (प्रतिनिधी)
मुंबई विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणांमुळेच म्हाडाला बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगतले. २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. महाराष्ट्र हा उत्कृष्ट वनस्पतीसमूह आणि प्राणिजात यांनी संपन्न असा प्रदेश आहे. नवीन पर्यटन धोरणामुळे या पर्यटन क्षेत्रातील वाढीची नवीन दालने खुली होतील, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह सेना दल, पोलीस दल, राज्य शासनाचे विविध विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य राखीव पोलीस दल, मुंबई पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस दल, निशाण टोळी, लोहमार्ग पोलीस दल, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस दल, राज्य परिवहन विभाग, अग्निशमन दल, महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, ब्रास बॅण्ड पथक, पाइप बॅण्ड पथक, मोटारसायकल वाहतूक पोलीस पथक यांनी या वेळी संचलन केले.
मोटार परिवहन विभागाच्या रक्षक बुलेटप्रूफ व्हॅन, मार्क्समन बुलेटप्रूफ व्हॅन, महिला सुरक्षा पथक, महारक्षक बुलेटप्रूफ व्हॅन, वरुण वॉटर कॅनन यांचे तसेच अग्निशमन दलाच्या फायर इंजिन व हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचेही प्रदर्शन या वेळी करण्यात आले.