"लोकसभा जागाबाबत आताच चर्चा नको, अन्यथा वातावरण सुखद होणार नाही"
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 8, 2023 12:19 PM2023-05-08T12:19:24+5:302023-05-08T12:19:49+5:30
राजीनामा मागे घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतक अस्वस्थ होते
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या जागा वाटप बाबत अद्याप चर्चा झालेली नाही. याबाबत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रित बसून चर्चा करणार आहोत. त्याआधी ही जागा मागा, ती जगा मागा या चर्चेमुळे वातावरण सुखद राहाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोलापुरात दिली.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. रात्री मुक्काम करून सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्टरने निपाणीकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते सोलापूर लोकसभा मतदार संघाची मागणी करत आहेत. यावर आपली प्रतिक्रिया काय, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी अद्याप यावर चर्चा झालेली नसल्याचे सांगितले.
राजीनामा मागे घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतक अस्वस्थ होते. त्यांच्यामुळे मला माझा निर्णय बदलावा लागला. त्यामुळे पुन्हा वेगाने काम करणार आहे. नव्या ऊर्जेने काम करणार आहे. माझी एक पद्धत आहे. नव्याने कामाला सुरूवात करताना सोलापूर किंवा कोल्हापूर येथून सुरूवात करतो. त्यामुळे मी सोलापुरात आलो आहे.