म्हशीच्या गळ्यातला लोडना तुमच्या पाठीत घालू : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:01 PM2020-08-24T18:01:11+5:302020-08-24T18:03:00+5:30

'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Let's put the load on the buffalo's neck on your back: Raju Shetty | म्हशीच्या गळ्यातला लोडना तुमच्या पाठीत घालू : राजू शेट्टी

सातारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी भव्य मोर्चा काढला.

Next
ठळक मुद्देम्हशीच्या गळ्यातला लोडना तुमच्या पाठीत घालू : राजू शेट्टीसाताऱ्यात बैलगाडीचा मोर्चा; केंद्र-राज्य सरकारला जोरदार इशारा

सातारा : 'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीचा मोर्चा काढला. केंद्र सरकारने दूध भुकटी व इतर दुग्धजन्य पदार्थांची आवक थांबवावी, दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कर रद्द करावा तसेच राज्य शासनाने गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, या मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत.

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोठ्या घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चातील सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.

आमदार शेट्टी म्हणाले, 'राज्यात ५० हजार तर दूध भुकटी शिल्लक आहे. बटरचा स्टॉक देखील मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. यामध्ये अब्जावधीचा पैसा गुंतलेला आहे. दुधाचे दर कोसळलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये गाईच्या दुधाचे दर घसरले.

या परिस्थितीत राज्य सरकारने सहकारी दूध संघांना पंचवीस रुपये लिटर दराने गाईचे दूध खरेदी करण्याचा आदेश काढले, त्यामध्ये दोन रुपये वाहतूक खर्च देखील सरकारनेच दिला. मात्र खासगी दूध संघ तसेच खासगी दूध व्यवसाय करणाऱ्यानीच सरकारच्या या योजनेचा फायदा उठवला.

राज्य सरकारचे दीडशे कोटी रुपये पाण्यात गेले. सध्याच्या घडीला गाईच्या दुधाला प्रति लिटर १७ रुपये भाव आहे. याच परिस्थितीत केंद्र सरकारने जर दूध भुकटी आणखी आयात करण्याचा निर्णय घेतला तर हे आदर देखील आणखी खाली येणार आहेत. गाईच्या दुधासाठी उत्पादन खर्च ३२ रुपये आणि विक्री खर्च १७ रुपये अशी परिस्थिती असून गोरगरीब शेतकरी अल्पभूधारक शेतमजूर जोडव्यवसाय करून दूध विक्री करतो आणि त्यावर आपली उपजीविका चालवतो, त्याच्या गळ्याला फास लागला आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजहंस या डेअरीने शेतकऱ्यांकडून दूध घेतले; परंतु अद्याप देखील त्यांना त्यांचे पैसे दिले नाहीत. पावडर निर्माण करणाऱ्या चोरांनी तर सरकारच्या योजनेचा पुरेपूर लाभ घेतला. ज्या ठिकाणी ३५ रूपयांना ते दूध खरेदी करत होते तेच आता अवघ्या १७ रुप ये दर देऊन दूध खरेदी करत आहेत. याठिकाणी कुंपणच शेत खाते अशी परिस्थिती आहे.

शेतकऱ्यांना आणखी किती तोट्यात जाणार आहात. त्याला किती खड्ड्यात घालणार आहात. ५० एकराचा मालक गुरे पाळत नाही तर अल्पभूधारक शेतकरी हा व्यवसाय करतो. त्याच्यात लढायची ताकद नाही, असं समजू नका आमच्या आंदोलन शांततेत चालले आहेत, त्याची चेष्टा करू नका किंवा त्यात ते बेदखल केले आहे, असेही ही वागू नका अन्यथा सरकारला आम्ही गुडघे टेकायला लावू.

आमच्या या घोषणा पोकळ नाही, आम्ही २००७, २०१९ मध्ये दूध आंदोलनाच्या माध्यमातून हे करून दाखवलं. आम्ही शेतकरी रागानं रस्त्यावर उतरलो तर सगळेच अडचणीत येतील. कुणाच्या दूध संघांना किती दुध घेतलं आणि किती दराने घेतलं आणि किती दराने ते विकलं, याचा सर्व काही लेखाजोखा माझ्याजवळ आहे. आमचं कुणाशी वाकड नाही पण शेतकऱ्यांना दर दिला नाही, तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा देखील आमदार शेट्टी यांनी यावेळी दिला.

विद्वान कधी निर्णय घेणार आहेत

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गाईच्या दुधाला कशा पद्धतीने दर देता येईल, यासाठी तज्ञ मंत्रिगटाची समिती नेमली. या समितीमध्ये ज्या राजहंस दूध संघाने शेतकऱ्याच्या दुधाला रुपया दिला नाही, त्या संघाचे प्रमुख महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समिती नेमली मात्र या विद्वान लोकांनी दोन महिने झाले तरी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.  बारामतीमध्ये मोर्चा काढून दूध संघांच्या व्यवहारांचा लेखाजोखा मांडणार असल्याचा इशारा आ. राजू शेट्टी यांनी दिला.

Web Title: Let's put the load on the buffalo's neck on your back: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.