एचए कंपनीला नवसंजीवनी देणार
By admin | Published: January 8, 2015 01:03 AM2015-01-08T01:03:22+5:302015-01-08T01:03:22+5:30
आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरीतील एच. ए. कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.
पिंपरी : आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरीतील एच. ए. कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. या कंपनीला निश्चितपणे नवसंजीवनी दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी पिंपरी येथे दिली.
केंद्रिय केंद्रिय रसायन व खत राज्यमंत्री अहीर यांनी रसायन मंत्रालयाचे सहसचिव अजिज अहमद यांच्याबरोबर बुधवारी पिंपरीतील एच. ए. कंपनीला भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. कपंनीचे अधिकारी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कंपनीच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी,आमदार गौतम चाबूकस्वार,भाजपचे शहरध्यक्ष सदाशिव खाडे, भारतीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब धुमाळ, एच. ए. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. वर्की, वित्त संचालक अनिल वैद्य, व्यवस्थापक टी दास, कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर आदि उपस्थित होते.
अहिर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय उद्योगधंद्यांना चालना देण्याची भूमिका आहे. देशात स्किल इंडियासारखे विकासाचे प्रकल्प हाती घेतले जात असताना, ज्या कंपनीत काम मिळाले पाहिजे, त्या कंपनीत कौशल्य आत्मसात केलेल्या कामगारांना स्वेच्छा निवृतीव्दारे
कमी करणे उचित ठरणारे नाही. एच ए तील कामगारांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यांचे थकित वेतन मिळाले पाहिजे,केवळ पुनर्वसन पॅकेज देऊन कंपनीला सावरण्यापेक्षा पुन्हा पुनर्वसन पॅकेज देण्याची वेळ येऊ
नये, यादृष्टीने कंपनीला पुनरूज्जीवन दिले जाईल. (प्रतिनिधी)
बायोफर्टिलायझर उत्पादनांचा विचार
४अन्य राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात वीज महाग आहे. स्वस्तात वीज आणि कच्चा माल उपलब्ध व्हावा, असे धोरण अवंलबण्याचे विचाराधिन आहे. तसेच बायोफर्टिलायझर यासारख्या पर्यायी उत्पादनांचाही विचार केला जाणार आहे. कंपनीच्या मालकीची काही जागा विक्री करून तसेच कर्ज स्वरूपात रक्कम उभी करून कामगारांची थकित देणी तसेच खेळत्या भांडवलासाठी सहाशे कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास ही कंपनी पुन्हा सुरू होईल. खासगी लोकसहभागातून अथवा अन्य मार्गाने सोईस्कर ठरेल, तो पर्याय स्वीकारून कंपनीला नवसंजीवनी दिली जाणार आहे.
४अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत चर्चा करून येत्या दहा दिवसात कंपनीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. चीनच्या औषध उत्पादनांचा भारतीय बाजारपेठेत शिरकाव झाल्याने, कंपनीच्या उत्पादनांना फटका बसला आहे. हे एक कारण तसेच अन्य कारणेही त्यास जबाबदार आहेत. परंतू आता त्याबाबत विचार करण्यापेक्षा कंपनीला संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणते पर्याय उपयुक्त ठरतील. याचा विचार करावा लागणार आहे.