आम्हाला जमीन दाखवणाऱ्या भाजपला अस्मान दाखवू; अमित शाह यांच्या हल्ल्यावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 11:16 AM2022-09-07T11:16:59+5:302022-09-07T11:20:22+5:30
ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद जर मला पाहिजे असते तर एका क्षणात मी ते सोडले नसते.
मुंबई : मुंबईत मंगलमूर्ती विराजमान झालेल्या आहेतच. काल एक अमंगल मूर्ती आले होते. शिवसेनेला जमीन दाखवायची आहे, असे ते बोलून गेले. त्यांना काय बोलायचे ते बोलू देत, पण आपण भाजपला पालिका निवडणुकीत अस्मान दाखवू, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणावर दिली.
ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित शाहचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा अमित शाह यांनी केली. त्यांना गणपतीच्या मंडपातही राजकारण दिसते. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत, पण या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला.
यावेळी भास्कर जाधव, अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू व अन्य आमदार उपस्थित होते. त्यांच्याकडे निर्देश करताना ते म्हणाले की, याही आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते, पण ते नेऊ शकले नाहीत. कारण निष्ठा हा असा विषय असतो की, त्याची कितीही किंमत लावली, तरी ती विकली जाऊ शकत नाही.
...तर क्षणात मुख्यमंत्रिपद सोडले नसते
ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद जर मला पाहिजे असते तर एका क्षणात मी ते सोडले नसते. आपल्यासोबत तीस ते चाळीस आमदार होते. मीही त्यांना डांबून ठेवून शकलो असतो. माझीही ममता बॅनर्जींकडे ओळख होती. मीही त्यांना कोलकात्याला घेऊन जाऊ शकलो असतो. राजस्थानला नेले असते, पण माझा तो स्वभाव नाही.
दसरा मेळाव्यात काय बोलायचे ते बोलणार -
राहायचे असेल तर निष्ठेने राहायचे. मनात शंका-कुशंका घेऊन राहायचे नाही. ज्यांना राहायचे त्यांनी निष्ठेने राहा, पण एक समाधान आहे की, माझ्यासोबत जे आहेत ते कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हेच आपले शिवसेनेचे वैभव आहे. दसरा मेळाव्यात आपल्याला काय बोलायचे ते बोलणारच आहे, आता तर मुख्यमंत्रिपदाचा मास्कही नसेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.