कुपोषणाचा प्रश्न मुळापासून सोडवू!
By admin | Published: July 21, 2016 03:34 AM2016-07-21T03:34:21+5:302016-07-21T03:34:21+5:30
मोखाडा-जव्हार भागातील कुपोषण हा आपण सर्वांच्याच चिंतेचा व जिव्हाळयाचा प्रश्न असून स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे उलटून गेल्या नंतरही हा प्रश्न सुटू नये हे नक्कीच भूषणावह नाही.
पालघर : मोखाडा-जव्हार भागातील कुपोषण हा आपण सर्वांच्याच चिंतेचा व जिव्हाळयाचा प्रश्न असून स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे उलटून गेल्या नंतरही हा प्रश्न सुटू नये हे नक्कीच भूषणावह नाही. मात्र असे असले तरी हा प्रश्न गुंतागुतीचा असून तत्कालीक उपाय योजनांची यातून मुक्तता मिळणार नाही. तर तो समूळ सोडवावा लागेल. त्यासाठीच जिल्हा प्रशासन प्रसूतीसह अन्य कारणांच्या उपाय योजनाच्या दिशेने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सांगितले.
पालघर जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत बांगर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या बरोबर पालघर जिल्हयाच्या स्थापनेची दोन वर्षाची वाटचाल व भविष्याचा वेध या संदर्भात सकारात्मक चर्चा पालघरच्या सोनोपंत दांडेकर सभागृहात पार पडली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील व सरचिटणीस पंकज राऊतसह पालघर बोईसर, वाडा, विक्रमगड, डहाणू इ. भागातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तर काही क्रेंद्रात रात्रीचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने गरीब रूग्णांना खाजगी सेवेकडे वळावे लागते. अथवा शेजारच्या सिल्व्हास येथील रूग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावे लागत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. या वेळी नुकतीच १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आल्याचे सांगून बायोमेट्रीक अटेंडन्ससह त्यांना प्रा.आ. केंद्राजवळ राहण्याच्या दृष्टीने रहिवासी संकुल व इतर सोयी सुविधा उभारण्याच्या सूचना आपण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्याचे निधी चौधरी यांनी सांगितले. तसेच महिलांच्या गर्भावस्थेची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणारे सोनोग्राफी मशीन सर्वच प्रा.आ. केंद्रात देण्यासंदर्भात जिल्हा नियोजन मधून निधीमधून तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हयातील रूग्णांना अधिक चांगली व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सिडकोच्या फ्लॅटमध्ये सिव्हील हॉस्पीटलसाठी जागा प्रस्तावित केल्याचे सांगून कुपोषण रोखण्यासाठी व्हीसीडीसी योजनेतून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तालुक्यात आहार पुन्हा सुरू केला आहे. फक्त कुपोषित मुलानाच अंडे देण्याचे प्रयोजन असले तरी जिल्हा नियोजनाच्या निधी मधून तीनही तालुक्यातील प्रत्येक मुलाला अंडे देण्याची तरतूद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सांगितले.
यावेळी जव्हार मोखाडयात अनेक वर्षांपासूनची कुपोषण व बालमृत्यूची जीवघेणी समस्या आपण आजही दूर करू शकलेलो नाही. हे जरी खरे असले तरी त्या बद्दलचे निर्माण झालेले प्रश्न हे आहाराशी निगडीत नसून अनेक पिढया पासूनचा हा प्रश्न असल्याचे जव्हार, विक्रमगड, मोखाडयात राजमाता जिजाऊ मिशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे त्यांनी सांगितले. कुपोषण बालमृत्यू, व माता मृत्यू रोखण्यासंदर्भात आपण शासनावर टीका करतो परंतु शासनाकडून अनेक प्रयास सुरूच आहेत. महिला, मुली मध्ये पिढीजात असणाऱ्या खुजेपणा मुळे प्रसूतिदरम्यान कमी वजानाचे बाळ जन्माला येण्याची बाब समोर आली असून सर्व समावेशक उपाय योजना सखोलपणे राबविण्याची गरज
निर्माण झाल्याचे बांगर म्हणाले. (प्रतिनिधी)
>अपंग प्रमाणपत्र आता पालघरमध्ये
शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी अपंगप्रमाणपत्रे आता ठाण्या ऐवजी पालघरजिल्हा शल्य चिकीत्सकांकडून मिळणार आहेत.
ग्रामीण रूग्णालये आणि शाळामधील सेवा पारदर्शक करण्याच्या दृष्टीने पथके नेमण्यात आली असून काही वैद्यकीय अधिकारी खाजगी प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून आल्यास तसा अहवाल वरिष्ठपातळीवर पाठविण्यात आल्याचेही चौधरी यांनी सांगितले.