"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 02:00 PM2023-07-10T14:00:01+5:302023-07-10T14:01:22+5:30

अजित पवारांच्या गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनीही सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

"Let's talk about our reach and well-being", Rupali Chakankar on Sadabhau Khot statement | "आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले 

"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले 

googlenewsNext

मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पुन्हा पक्षबांधणीसाठी शरद पवार महाराष्ट्र भर फिरणार आहेत. यासाठी त्यांनी सुरूवात नाशिकमधून केली. तर येवला येथे सभा घेत बंडखोरांवर टीका केली. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यांनी, पूर्वी बापाने पाप केले की ते मुलाला फेडावे लागत होते. पण, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच फेडावे लागते. पवारांना आता हे पाप फेडावे लागणार आहेत. तर भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका केली होती. 

सदाभाऊ खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. तसेच, या टीकेनंतर अजित पवारांच्या गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनीही सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. "आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय संतापजनक विधाने करणाऱ्या विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी बोलावं. राष्ट्रवादी काय आहे, हे आपण सांगण्याची गरज नाही, ज्या माणसाला पक्ष स्थापन करून चार कार्यकर्ते जमवता आले नाहीत, त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही", अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांना फटकारले आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला असून त्यांना इशारा दिला आहे. सदाभाऊंनी आपल्या जिभेवरती ताबा ठेवावा. कारण पवार साहेबांपासून आम्ही बाजूला झालो जरी असलो तरी आजही ते आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवतावरती केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही. सदाभाऊंनी जे काय बोलायचे ते इतरांवरती बोलावं. पवार साहेबांवर बोलण्याची हिंमत करू नये आपली उंची पाहून त्यांनी बोलावं असा टोला सुरज चव्हाण यांनी लगावला आहे.

Web Title: "Let's talk about our reach and well-being", Rupali Chakankar on Sadabhau Khot statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.