रानडे इन्स्टिट्यूटवर ‘लेटरबाँम्ब’
By Admin | Published: May 10, 2016 01:19 AM2016-05-10T01:19:21+5:302016-05-10T01:19:21+5:30
एफटीआयआय पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटला ‘लेटर बॉम्ब’ मिळाला आहे. संस्थेला शनिवारी पोस्टाद्वारे आलेले हे पार्सल सोमवारी दुपारी उघडण्यात आले.
पुणे : एफटीआयआय पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटला ‘लेटर बॉम्ब’ मिळाला आहे. संस्थेला शनिवारी पोस्टाद्वारे आलेले हे पार्सल सोमवारी दुपारी उघडण्यात आले. तेव्हा त्यामध्ये डिटोनेटर, स्फोटक पावडरसोबत ‘तुम्ही कन्हैया कुमारला पाठींबा दिला. त्यामुळे आम्ही हाय एक्स्प्लोजिव्ह पाठवत आहोत’ असे पत्र आढळून आले. एफटीआयआयला पाठवण्यात आलेलेच पत्र रानडे इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
रानडे इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. माधवी रेड्डी यांच्या नावाने एक बंद लिफाफा पोस्टाद्वारे आला होता. शनिवारी हा लिफाफा संस्थेला मिळाला होता. मात्र, त्यादिवशी उघडण्यात आला नाही. रविवारच्या सुटीनंतर सोमवारी कार्यालय उघडण्यात आले. दुपारी पत्र पहात असताना हा लिफाफा फोडण्यात आला. तेव्हा आतमध्ये एक डिटोनेटर, स्फोटक पावडर आणि पत्र मिळाले. याबाबत संस्थास्तरावर चर्चा केल्यानंतर संध्याकाळी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
संस्थेच्या पदाधिका-यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात अधिका-यांची भेट घेतली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त टी. डी. गौड पोलीस ठाण्यात आले. संस्थेला आलेले पार्सल ताब्यात घेऊन तपासणीकरिता बॉम्बशोधक व नाशक पथकाकडे पाठवण्यात आले आहे. या दोन्ही घटना आम्ही गांभिर्याने घेतल्या असून आमचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले. हे दोन्ही पार्सल शहरामधूनच पाठवण्यात आले असून त्याचा शोध घेण्यात यशस्वी होऊ असेही ते म्हणाले. एफटीआयआयला आणि रानडे इन्स्टीट्युटला आलेले पार्सल सारखेच असून केवळ पत्ता बदलून पाठवण्यात आले आहे.
पत्रावरचा मजकुर इंग्रजीमध्ये असून टंकलिखीत स्वरुपात आहे. डेक्कन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सुरक्षा अधिकारी मारुती भिमराव चव्हाण (वय ५६, रा. मयुर नगरी, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. एफटीआय पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटमध्ये लेटर बॉम्ब आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून विद्यार्थ्यांनी या प्रकाराचा निषेध
केला आहे.
>रानडे इन्स्टिट्यूटच्या विभाग प्रमुखांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात कन्हैया कुमारला पाठींबा दिलात तर महागात पडेल,अशा स्वरुपाचा मचकूर आहे. सोमवारी दुपारी विभाग प्रमुख माधवी रेड्डी यांनी धमकीचे पत्र आल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागामार्फत डेक्कन पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली आहे.
- डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.