साहित्यिकांच्या मानधनावर संक्रांत, महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:51 AM2017-12-01T04:51:21+5:302017-12-01T04:52:08+5:30
बडोद्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाला शासनाने केवळ २५ लक्ष रुपयांचे तुटपुंजे अर्थसाहाय्य केल्यामुळे निमंत्रितांनी प्रवासखर्चाचा त्याग करावा आणि मानधनाची अपेक्षा करू नये, असे आवाहन करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे.
नागपूर : बडोद्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाला शासनाने केवळ २५ लक्ष रुपयांचे तुटपुंजे अर्थसाहाय्य केल्यामुळे निमंत्रितांनी प्रवासखर्चाचा त्याग करावा आणि मानधनाची अपेक्षा करू नये, असे आवाहन करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. त्यामुळे शासनाने
किमान एक कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासन मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी २५ लाख रुपये देते. मात्र गेल्या २५ वर्षांपासून हे अनुदान तेवढेच असल्याने त्या
रकमेचे आजचे भरपाई मूल्य म्हणून ही रक्कम किमान एक कोटी करावी, यासाठी महामंडळाने डोंबिवलीत झालेल्या ९०व्या साहित्य संमेलनात तसा ठराव करून शासनाकडे पाठविला. त्याचा पाठपुरावाही सातत्याने सुरू आहे. मात्र शासन अद्यापही याबाबत निर्णय घ्यायला तयार नाही. हा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.