बलात्कार प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
By admin | Published: May 23, 2017 01:51 AM2017-05-23T01:51:39+5:302017-05-23T01:51:39+5:30
वैद्यकीय अहवालात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत असूनही मुंब्रा पोलीस आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोप करणारे पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैद्यकीय अहवालात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत असूनही मुंब्रा पोलीस आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोप करणारे पत्र तेथील एका कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्रालय व ठाणे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे़
अॅड़ प्रकाश साळशिंगिकर यांच्यामार्फत पीडित कुटुंबाने हे पत्र लिहिले आहे़ हे कुटुंब शीळ- डायघर पोलीस ठाणे हद्दीत राहते़ भंगार वेचून ते उदरनिर्वाह करतात़ त्यांच्या शेजारी शेट्टी कुटुंब राहते़ शेट्टी कुटुंबाचे नातलग कुर्ला येथे राहतात़ मार्च महिन्यात घरात कोणी नसताना करण शेट्टी माझ्या १४ वर्षीय मुलीला घेऊन गेला़ त्याने तिला कुर्ला येथील त्याच्या नातलगांकडे नेले़ तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला, असा तपशील या पत्रात देण्यात आला आहे.
मुलगी हरवल्याची तक्रार या कुटुंबियांनी लगेचच पोलिसांत दिली होती़ त्यानंतर मुलगी करण शेट्टीसोबत गेल्याचे कळाले़ पुढे पाठपुरावा केल्यानंतर मुलीचा ताबा मिळाला़ करणने काही अत्याचार केला का, असे वारंवार तिला विचारले़ मात्र ती खूप घाबरलेली होती़ कोणाला काही सांगशील, तर तुझ्या कुटुंबियांना ठार करू, असे शेट्टी कुटुंबियांनी तिला धमकावले होते़ मुलगी फारसे काही सांगत नसल्याने नंतर मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली़ त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालाद्वारे स्पष्ट झाले़ त्याचा पुरावाच मिळाला. त्यामुळे करणने अत्याचार केला आहे़; त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी वारंवार पोलिसांना केली़ मात्र पोलीस आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत नाहीत़ तुम्हीच आता न्याय द्यावा, अशी विनंती पीडित कुटुंबाने पत्रात केली आहे़