शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची केंद्राकडून दखल , केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे शिक्षण सचिवांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:23 AM2018-04-21T01:23:52+5:302018-04-21T01:23:52+5:30
राज्यातल्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची दखल थेट केंद्राने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांनीच राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शिक्षण सचिवांना नुकतेच दिले आहेत.
मुंबई : राज्यातल्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची दखल थेट केंद्राने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांनीच राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शिक्षण सचिवांना नुकतेच दिले आहेत. यामुळे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्यासह राज्यातील अनेक शिक्षण संचालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईतील विविध शाळा मिळून जवळपास १ हजार २४ असा ‘तुकडी घोटाळा’ झाला असून, याची चौकशी करावी, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीकडून (टीडीएफ) होत आहे. शालेय शिक्षण विभागातील बहुतांश अधिकारी हे पैसे घेतल्याशिवाय एकही फाईल सरकवत नाहीत. यामुळे मुंबईतील अनेक शिक्षकांना त्रास होत असल्याचा आरोप करत टीडीएफने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केला. त्याची दखल घेत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे अवर सचिव एच. एम. सोनकेसरे यांनी या चौकशीचे तसेच त्याचे तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत.
त्यांनी दिलेल्या या आदेशामुळे ‘तुकडी घोटाळ्या’सह शिक्षण विभागातील इतर घोटाळेही बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्यासह राज्यातील अनेक शिक्षण संचालकांच्या अडचणीत वाढ होतील, अशी चर्चा आहे.
शिक्षण विभागातील अधिकारी स्वत: या शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारात सामील असल्याने त्याची चौकशी होऊ देत नाहीत. स्वत: सचिव आणि शिक्षणमंत्रीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे आम्हाला पंतप्रधान आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासाला पत्र लिहावे लागले. यापुढे तरी शिक्षण विभागातील या भ्रष्टाचाराची चौकशी होईल, अशी अपेक्षा आहे.
- जनार्दन जंगले, अध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी