केडीएमसीचे मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण यांची चौकशी करा सभागृह नेते राजेश मोरेंचे आयुक्त पी.वेलारसू यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:40 PM2017-11-07T18:40:09+5:302017-11-07T18:43:03+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असून त्याला मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण हे जबाबदार असून त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी, तसेच ज्या अधिका-यांना ३ वर्षे झाली आहेत अशा अधिका-यांना शासनाकडे परत पाठवावे, जेणेकरुन महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी होण्यास सहाय्य होईल अशी मागणी सभागृह नेते राजेश मोरे यांनी आयुक्त पी.वेलारसू यांना केली
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असून त्याला मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण हे जबाबदार असून त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी, तसेच ज्या अधिका-यांना ३ वर्षे झाली आहेत अशा अधिका-यांना शासनाकडे परत पाठवावे, जेणेकरुन महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी होण्यास सहाय्य होईल अशी मागणी सभागृह नेते राजेश मोरे यांनी आयुक्त पी.वेलारसू यांना केली आहे.
तसे पत्र मोरेंनी मंगळवारी आयुक्तांना पाठवले असून मागील तीन वर्षात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक झालेली आहे, त्यासंदर्भात सातत्याने आवाज उठवला असून त्याचा काहीही परिणाम होत नाही. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतांना त्याची जाणिव चव्हाण यांना नाही. २०१० च्या अर्थसंकल्पाचा आढावा घेतल्यास त्यातील अनेक त्रुटी स्पष्ट होतील. तेव्हाची कामे अजून सुरु असून कामांचा कालावधी संपल्यावरही वाढीव काम असे सांगितले जात आहे. चव्हाण यांच्या कामाची अजब पद्धत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.
केडीएमसीची निवड स्मार्टसिटी प्रकल्पात झाली, त्यासाठी पहिल्या टप्प्याचा निधी १५० करोड रुपये प्राप्त झाले. ही रक्कम गुंतवणूक करतांना मार्गदर्शक तत्व काय होती. ती गुंतवणूक करतांना पाळली गेली की नाही? ज्या बँकेत गुंतवणूक केली तिथे व्याजदर हा अन्य बँकांच्या तुलनेत कसा आहे याची तुलना कशी केली गेली याबाबतचा तपशील मिळू शकेल का? अशीही विचारणा मोरेंनी पत्रात केली आहे. असा सर्वांगिण विचार करुन महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत करणा-या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्यामुळे जे अधिकारी ३ वर्षांसाठी येतात त्यांची तातडीने बदली करावी, आधीच डबघाईत असलेल्या महापालिकेवरचा बोजा कमी करावा असेही त्यांनी म्हंटले. कोणतीही विकास कामे होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या असंतोषाचा सामना लोकप्रतिनिधींना करावा लागतो. अशा स्थितीमुळे सशक्त लोकशाही कशी होईल असा सवालही त्यांनी केला.
- मी शासनाच्या नियमावलीला सुसंगत पद्धतीनेच काम करतो. त्यामुळेच कोणालाही बील देतांना नियमावली पाळावी असा माझा आग्रह असतो, कदाचित त्यामुळेच काहीजण दुखावले जात असतील. माझा केडीएमसीतील कार्यकाळ संपुष्टात आला असून शासनाने बदली केल्यास मी तात्काळ चार्ज सोडेन - दिग्विजय चव्हाण, मुख्य लेखा अधिकारी, केडीएमसी