‘नीट’संदर्भात ‘मार्ड’चे पंतप्रधानांना पत्र
By admin | Published: May 14, 2016 02:50 AM2016-05-14T02:50:07+5:302016-05-14T02:50:07+5:30
वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील चार लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न नीटमुळे भंगणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे
मुंंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील चार लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न नीटमुळे भंगणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे. एमएचसीईटी देऊनसुद्धा विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागणार असल्यामुळे विद्यार्थी, पालक तणावाखाली आहेत. महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) विद्यार्थ्यांची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना पत्र लिहिले आहे.
नीट ही परीक्षा देशातील अनेक शिक्षण मंडळांच्या बारावीच्या समान अभ्यासक्रमांवर घेण्याची मागणी मार्डने केली आहे. यासाठी एका समितीची स्थापना करावी, असे आवाहनही मार्डने केले आहे. नीट ही सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यामुळे या परीक्षेचा मोठा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. अवघ्या तीन महिन्यांत सीबीएसीईचा अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांसाठी मोठे आवाहन आहे. राज्य सरकारही यासाठी प्रयत्न करीत आहे. नीट ही सीबीएसईच्या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असते.
राज्यात सीईटी दिलेल्या बहुतांश विद्यार्थी नीट २ च्या परीक्षेलाही बसणार आहेत. तरीही त्यांचे कमी नुकसान व्हावे म्हणून बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली असल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)